फाईलींच्या वर्गीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:24 IST2017-11-12T00:24:30+5:302017-11-12T00:24:35+5:30
राज्याच्या कृषी आयुक्तांनी फाईलींच्या वर्गीकरणासंदर्भात आदेश काढल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशीही येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी दिवसभर वर्गीकरणाच्या कामात गुंतले असल्याचे दिसून आले.

फाईलींच्या वर्गीकरणास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्याच्या कृषी आयुक्तांनी फाईलींच्या वर्गीकरणासंदर्भात आदेश काढल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशीही येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी दिवसभर वर्गीकरणाच्या कामात गुंतले असल्याचे दिसून आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ड वर्गीय कागदपत्रे, अभिलेखे आणि अनावश्यक कागदपत्रे मोठ्या प्रमाणात पडून आहेत. मागील अनेक दिवसांपासून या कागदपत्रांचे वर्गीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जुन्या फाईली, कागदपत्रे पडून असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबत लक्ष घातले. परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात फाईल आणि टपालांचे वर्गीकरण होत नसल्याने अभिलेखे वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच कार्यालय परिसरात अस्वच्छता पसरते, ही बाब त्यांनी एका पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. याच अनुषंगाने कार्यालयातील संपूर्ण कागदपत्रांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याचे निर्देश उपविभागीय कृषी अधिकाºयांना दिले होते. विशेष म्हणजे, ११ व १२ नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालयाला सुटी असते. हा सुटीचा दिवस फाईलींच्या वर्गीकरणासाठी वापरावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले होते.
कृषी आयुक्त एस.पी. सिंह यांच्या या निर्देशानुसार ११ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित झाले. दुपारी ४ वाजता या कार्यालयास भेट दिली असता कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दस्ताऐवजाच्या वर्गीकरणात मग्न असल्याचे पहावयास मिळाले. मागील अनेक वर्षापासूनच कागदपत्र, फाईली काढून त्या फाईलींचे गठ्ठे बांधले जात होते.
प्रत्येक फाईलींना नाव देऊन अ, ब, क, ड या चार वर्गात वर्गीकरण करण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करीत होते. अनेक दिवसांपासून कागदपत्रांचे वर्गीकरण झाले नसल्याने मोठ्या प्रमाणात कागदपत्र, फाईली टेबलांवर पहावयास मिळाल्या.