परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना गावापर्यंत एसटीची सेवा
By Admin | Updated: July 3, 2017 00:35 IST2017-07-03T00:30:41+5:302017-07-03T00:35:12+5:30
नांदेड : विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासात भीमा स्थानक, पंढरपूर येथून आपल्या गावापर्यंतच्या प्रवासासाठी एसटी सेवा देणार आहे़

परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना गावापर्यंत एसटीची सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासात भीमा स्थानक, पंढरपूर येथून आपल्या गावापर्यंतच्या प्रवासासाठी एसटी सेवा देणार आहे़ त्यासाठी एका गावातील ४० ते ४५ जणांचा ग्रुप असणे आवश्यक आहे़ अशा गावकऱ्यांनी पंढरपूर येथील नांदेड वाहतूक केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी पी़ एस़ नेहूल यांनी केले आहे़
आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच हजारो वारकरी एकादशीच्या दोन दिवस अगोदर एसटी अथवा खासगी वाहनाने पंढरपूरला जातात़ अशा हजारो वारकऱ्यांना प्रवासाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने राज्यभरातून पंढरपूर यात्रा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करून गाड्या सोडल्या आहेत़ रविवारी सायंकाळपर्यंत नांदेड विभागातून जवळपास ११० बसेस पंढरपूरसाठी रवाना झाल्या असून यामध्ये चार ते पाच हजार वारकऱ्यांचा समावेश आहे़ पंढरपूरसाठी जाणारी गाडी सहज लक्षात यावी म्हणून गाडीच्या समोरील काचावर ठळकपणे पंढरपूर यात्रा विशेष असा उल्लेख असलेले स्टीकर चिकटविले आहेत़
नांदेड विभागातून सोडण्यात येणाऱ्या बसेसचे प्रवाशांच्या मागणीनुसार नियोजन करण्यात येत आहे़ २०५ पैकी नांदेड आगारातून ५५, कंधार - ३५, मुखेड - २०, देगलूर - २०, बिलोली - २०, हदगाव- २०, किनवट- १५, माहूर - १० गाड्या सोडल्या जाणार आहेत़
दरम्यान, प्रवासामध्ये बसेस नादुरूस्त होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात असल्याचे नेहूल यांनी सांगितले़ २९ जूनपासून पंढरपूर विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत़ नांदेड आगारातून जवळपास ३० गाड्या सोडल्या आहेत़ यामध्ये सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे़
नांदेड विभागाअंतर्गत नांदेड आगारातून सर्वाधिक गाड्या सोडण्यात येतात़ परंतु, प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक प्रवासी पंढरपूर गाड्यांकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़
पंढपूरला जाणाऱ्यांमध्ये बहुतांश प्रवाशी हे ग्रामीण भागात, असुशिक्षित आणि वयस्क असतात़ या सर्व बाबींचा विचार करून एसटी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत़ परंतु, नांदेड आगारात तसे दिसत नाही़ ग्रामीण भागासाठी जेथून गाड्या सोडल्या जातात़ तेथून पंढरपूरसाठी गाड्या सोडल्या जात आहेत़ परंतु, याठिकाणी प्रवाशांसाठी विशेष टेंट उभारले नाही़