सचखंड एक्स्प्रेसवर दगडफेक
By Admin | Updated: April 24, 2016 00:16 IST2016-04-24T00:02:30+5:302016-04-24T00:16:02+5:30
औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरीसाठी रेल्वेच्या दरवाजातील प्रवाशांवर दगडफेक आणि काठीहल्ला करण्याचे प्रकार सरू असताना शनिवारी सचखंड एक्स्प्रेसच्या इंजिनवर दगडफेक झाल्याने चालक जखमी

सचखंड एक्स्प्रेसवर दगडफेक
औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरीसाठी रेल्वेच्या दरवाजातील प्रवाशांवर दगडफेक आणि काठीहल्ला करण्याचे प्रकार सरू असताना शनिवारी सचखंड एक्स्प्रेसच्या इंजिनवर दगडफेक झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना दौलताबाद-औरंगाबाददरम्यान घडली.
याविषयी अधिक माहिती अशी, अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास दौलताबाद रेल्वेस्टेशन सोडले; परंतु अवघ्या काही अंतरावर उभ्या असलेल्या तरुणांच्या घोळक्यातील एकाने इंजिनवर दगड भिरकावला. यावेळी इंजिनच्या कक्षावरील काचेतून हा दगड आरपार होत थेट चालक राम मोहन राव यांच्या डोक्याला लागला. त्यामुळे ते जखमी झाले. सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वेस्टेशनला आल्यानंतर हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
राम मोहन राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य चालकाची व्यवस्था करून सचखंड एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे रुळाच्या बाजूला उभे राहून मोबाईलवर मग्न असलेल्या प्रवाशाला दगड अथवा काठी मारायची आणि मोबाईल पळवायचा असा उद्योग काही जणांकडून सुरू आहे. अशा दगडफेकीने प्रवाशांचे मोबाईल तर चोरीला जातात; परंतु दगड, काठी मारल्याने प्रवासी जखमी होण्याचे प्रकार होतात.
शनिवारी झालेली दगडफेकीची घटना मोबाईल पळविण्याच्या हेतूनेच झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दगडफेकीसारख्या प्रकारावर आळा घालण्यासाठी लोकांचे समुदेशनही केले जात असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांनी सांगितले.