संततधार पाऊस
By Admin | Updated: September 1, 2014 00:28 IST2014-09-01T00:18:42+5:302014-09-01T00:28:16+5:30
हिंगोली : संपूर्ण मघात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर पूर्वा नक्षत्राची सुरूवातच जोरदार पावसाने झाली.

संततधार पाऊस
हिंगोली : संपूर्ण मघात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर पूर्वा नक्षत्राची सुरूवातच जोरदार पावसाने झाली. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसात रविवारी सायंकाळपर्यंत खंड पडला नव्हता. अधूनमधून पावसाचा जोर चांगलाच वाढत राहिल्याने जिल्ह्याच्या सरासरीने ३०० मिमीचा टप्पा ओलांडला. विशेषत: संपूर्ण मघा नक्षत्रात १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पूर्वाच्या पहिल्याच दिवशी ३७ मिमी पाऊस पडला.
मागील पंधरा दिवसांपासून पावसात सातत्य होते. ३० आॅगस्ट रोजी सुरूवात झालेल्या पूर्वा नक्षत्रातही पावसाची गरज होती. दुसरीकडे पोळ्यापासून पाऊस कमी-कमी होत जाण्याची भीती होती. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्री तापमानात घट होताच जोरदार पावसास सुरूवात झाली. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या पावसात सायंकाळपर्यंत खंड पडला नव्हता. दरम्यान जोरदार वृष्टी होत राहिली. आदल्या रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने कोरड्या जमिनीची तहान भागली. खडकाळ जमिनीच्या बाहेर पाणी निघाले. जिल्ह्यातील बहुतांश ओढे, नाले वाहते झाले. बंधारे, शेततळे, बांध तुडुंब भरले. सर्वत्र मातीमिश्रीत पाणी साचले. आता हळूहळू पाणीपातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यात पाऊस सुरूच राहिला तर विहिरी काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. अद्याप हिंगोली तालुक्यात इतर तालुक्यांच्या मानाने कमी पाऊस आहे. सुरूवातीपासूनच पाऊस कमी असताना शनिवारी २० मिमीची नोंद झाली. सर्व तालुके ३०० मिमीच्या जवळ पोहोचले असताना हिंगोलीने २०० मिमीचीही सरासरी गाठली नव्हती. उलट औंढा तालुक्यात दिवसेंदिवस जोराचा पाऊस होत असून शनिवारीही २६ मिमी पाऊस झाला. कळमनुरीत पहिल्यांदा विक्रमी ७५ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल वसमतमध्ये ४१ मिमी पाऊस झाला. यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
३ वीज खांब कोसळले
हिंगोली तालुक्यातील राजवाडी शिवारात ३ विद्युत खांब कोसळले. पाऊस आणि वाऱ्यामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने खांबांचे वजन सहन झाले नाही. राजवाडीतील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागला. रविवारी ३ वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम सुरूच होते.
संततधार पावसाने जलपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकरी सुखावला आहे.