पथके गावांमध्येच तळ ठोकून

By Admin | Updated: September 3, 2014 01:09 IST2014-09-03T00:53:05+5:302014-09-03T01:09:12+5:30

जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती, कोदोली आणि जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश तापेच्या साथीने दोन भावंडांसह एका तरूणाचा बळी गेल्याने या तिन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत

Stage the camps in the villages | पथके गावांमध्येच तळ ठोकून

पथके गावांमध्येच तळ ठोकून


जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती, कोदोली आणि जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश तापेच्या साथीने दोन भावंडांसह एका तरूणाचा बळी गेल्याने या तिन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. दरम्यान, ‘लोकमत’ ने गेल्या दोन दिवसांपासून याकडे आरोग्य विभागाचे लक्ष वेधल्यानंतर तीन पथके गावांमध्ये तळ ठोकून आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा पथक मंगळवारी पुन्हा पद्मावती गावात गेले. घरोघर पाण्यात डासअळी आहे किंवा नाही, याची पुन्हा तपासणी करण्यात आली.
गावात गवत वाढल्याने ते कापण्याची तसेच गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना ग्रामपंचायतला करण्यात आली. पुन्हा धूरफवारणी करण्यात येणार आहे. सध्या गावात तापाचे दोन रुग्ण असून त्यांचेही रक्त नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
या पथकात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॉ. अमोल गंधर, डॉ. एस.के. लांडगे यांचा समावेश आहे.
जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश आजाराने अमोल कैलास सपकाळ (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला.
‘लोकमत’च्या २ सप्टेंबर रोजीच्या या वृत्तानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक या गावातही दाखल झाले. ११०० घरांमधील पाण्याची तपासणी करण्यात आल्यानंतर ७८ ठिकाणी डासअळी आढळून आल्याचे डॉ. लांडगे यांनी सांगितले.
कोदोली येथेही आरोग्य पथक दाखल झाले असून गावातही सर्व्हे करण्यात आला. तापाचे चार रुग्ण आढळून आले. त्यांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, साथरोग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत ही पथके संबंधित गावातच थांबणार असल्याचे आरोग्य पथकातील सदस्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पद्मावती, कोदोली आणि जळगाव सपकाळ या तिन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. सर्दी झाली तरी धसकी भरते. मात्र ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, गावात आरोग्य पथके तैनात करण्यात आलेली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर यांनी सांगितले. पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Stage the camps in the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.