चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक

By Admin | Updated: October 30, 2014 00:30 IST2014-10-30T00:17:56+5:302014-10-30T00:30:50+5:30

अजिंठा- पेट्रोलिंगवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आठ ते दहा चोरट्यांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली.

Stacked police thieves | चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक

चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक

अजिंठा- संशयितरीत्या आढळून आलेल्या विना क्रमांक टेम्पोची झडती घेण्यासाठी गेलेल्या पेट्रोलिंगवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आठ ते दहा चोरट्यांनी दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची घटना वाघोरा फाटा ते शिवना रस्त्यावर मंगळवारी रात्री घडली. यात पोलिसांच्या जीपचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी अजिंठा पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.कॉ अंकुश बागल, जीपचालक पो.कॉ. मिर्झा बेग अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. त्यांच्या सोबत फौजदार अनंत जगताप होते. या हल्ल्यात त्यांना जखम झाली नाही. मंगळवारी रात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. यावेळी त्यांना वाघेरा फाटा ते शिवना रस्त्यावर एक टेम्पो (विना क्रमांक) संशयितरीत्या आढळून आला. तो टेम्पो अडवून तपासणीसाठी बागल व मिर्झा बेग हे पोलीस टेम्पोत चढत असताना आत ताडपत्री टाकून बसलेल्या ८ ते १० चोरट्यांनी पोलीस व त्यांच्या जीपवर आतूनच दगडफेक केली. चोरट्यांनी टेम्पोत आधीच दगड भरून ठेवले होते. यातील काही दगड पोलिसांना लागले तर काही पोलिसांच्या जीपवर लागल्याने जीपच्या काचा फुटल्या. दगड लागताच पोलिसांनी वाहनातून उडी मारली. त्यामुळे ते बालंबाल बचावले. ते सर्वजण चोरी करण्याच्या तयारीत होते.
पोलिसांमुळे त्यांचा बेत फसणार होता. म्हणूनच त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फौजदार जगताप यांनी स्वत:कडील पिस्तूल चोरट्यांवर ताणली तेव्हा त्यांनी वाहनासह पोबारा केला. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी राम मांडुरके, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. बिर्ला, ग्रामीण पोलीस ठाण्याचे मिलिंद खोपडे, सोयगाव पोलिसांनी व गुन्हे शाखा पोलिसांनी परिसरात रात्रभर गस्त घातली; पण त्यांना काहीच सुगावा लागला नाही. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. अजिंठा परिसरात गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. मागील आठवड्यात धोत्रा - शिवना रस्त्यावर एका दुचाकीस्वारास अडवून २५ लाख रुपये लुटले होते . त्या पाच आरोपींना पोलिसांनी १२ तासांच्या आत पकडले होते. आता पोलिसांवरच हल्ला झाला आहे. ते अज्ञात आरोपी कोण? पोलिसांवर हल्ला का केला याचा शोध अजिंठा पोलीस घेत आहेत.

Web Title: Stacked police thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.