एसटी कामगारांची निदर्शने
By Admin | Updated: January 5, 2016 00:11 IST2016-01-04T23:33:34+5:302016-01-05T00:11:44+5:30
लातूर : गेल्या महिन्यामध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एसटी बंदचे आंदोलन केले़

एसटी कामगारांची निदर्शने
लातूर : गेल्या महिन्यामध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एसटी बंदचे आंदोलन केले़ त्यामुळे एसटीच्या २ हजार वाहक-चालकांचा १६ दिवसांचा पगार कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्याविरुद्ध एस.टी. कामगारांनी सोमवारी निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांचे वेतन हे इतर खात्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा खूप कमी आहे़ परिणामी, कामगार कर्जबाजारीही होत आहेत़ तुटपुंज्या पगारावर काम करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ त्यातच वेतनाच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळातील २४०० वाहक-चालकांनी १७ व १८ डिसेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत एसटी अत्यावश्यक सेवा असताना बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले़ त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस संघटनेच्या लातूर विभागातील पदाधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर वेतन कपातीचे परिपत्रक रद्द करा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. (प्रतिनिधी)
आंदोलनात डॉ़बलभिम पाटील, व्यंकटराव बिराजदार, विजयकुमार बनसोडे, रमेश काळे, अभिषेक पाटील, सुधीर मिरजकर, शरद राठोड, के़ एम़ कोरे, यु़ के़ गायकवाड, सातपुते, उस्मान पठाण, महेश मेंडोळे, रवी पांचाळ, महिला प्रतिनिधी अश्विनी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.