एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘शिस्त कट्टा’
By Admin | Updated: April 18, 2016 00:58 IST2016-04-18T00:58:40+5:302016-04-18T00:58:40+5:30
औरंगाबाद : सगळ्यांनी मिळून उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी अथवा हास्य विनोद करण्यासाठी नेहमी भेटण्यासाठी एक जागा हवी असते.

एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘शिस्त कट्टा’
औरंगाबाद : सगळ्यांनी मिळून उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी अथवा हास्य विनोद करण्यासाठी नेहमी भेटण्यासाठी एक जागा हवी असते. ती हक्काची जागा म्हणजे ‘कट्टा’. एस. टी. महामंडळानेही आता कर्मचाऱ्यांसाठी आगारांमध्ये ‘कट्टा’ उपलब्ध करून दिला आहे. परंतु उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी नव्हे तर कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, गैरवर्तन टाळावे आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून द्यावी म्हणून हा ‘शिस्त कट्टा’ राहणार
आहे.
एस. टी. महामंडळातर्फे राज्यातील प्रत्येक बस आगारांमध्ये यापुढे हा ‘शिस्त कट्टा’ राहणार आहे. या शिस्त कट्ट्याच्या ठिकाणी मोठा सूचना फलक लावण्यात आला आहे. या फलकावर कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी दिलेल्या नोटिसा, दंडात्मक कारवाईचे आदेश, नवीन नियम आदींची माहिती देण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी शिस्त कट्टा उभारण्याचे आदेश प्रत्येक विभागास दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारात हा कट्टा सुरू करण्यात आला आहे.
शिस्त कट्ट्याच्या माध्यमातून कर्मचारी म्हणून एस. टी. महामंडळाविषयी, प्रवाशांविषयी असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात येणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना एकमेकांशी संवाददेखील साधता येणार आहे. त्यासाठी पुरेशी मोकळी जागा राहणार आहे. सूचना फलकावर लावण्यात येणाऱ्या माहितीवर प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना ही चर्चा करता येईल. या फलकावरील मजकूर बदलत राहील, याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.