एसटी, रेल्वेची निवासस्थाने फुल्ल
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:15:44+5:302014-09-03T00:20:34+5:30
एसटी महामंडळ आणि रेल्वेची सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल असून यामध्ये अनेकजण सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे.

एसटी, रेल्वेची निवासस्थाने फुल्ल
संतोष हिरेमठ, औरंगाबाद
राज्य परिवहन महामंडळ आणि दक्षिण मध्य रेल्वेचे अनेक कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शासकीय निवासस्थान कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत. एसटी महामंडळ आणि रेल्वेची सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल असून यामध्ये अनेकजण सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे. कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निवासस्थानांची अपुरी संख्या, सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्याची तयारी नसणे, अशा विविध कारणांमुळे अन्य कर्मचाऱ्यांना निवासस्थान मिळविण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाची विभाग नियंत्रक कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानक येथे निवासस्थाने आहेत, तर दक्षिण मध्य रेल्वेची रेल्वे स्थानक परिसरात निवासस्थाने आहेत. वर्ग एक ते वर्ग चार याप्रमाणे ही निवासस्थाने आहेत. विविध ठिकाणांहून बदली होऊन आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अशी निवासस्थाने सोयीची ठरतात. कामाच्या ठिकाणी ये-जा करणे सुलभ व्हावे, तसेच आर्थिकदृष्ट्या विचार करता अनेकांचा शासकीय निवासस्थानांमध्ये राहण्यावर भर असतो; परंतु निवासस्थान मिळविण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव अनेक कर्मचाऱ्यांना येत आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची अनेक निवासस्थाने रिकामी होती; परंतु सध्या सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल आहेत. यामध्ये काही कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही निवासस्थानांचा ताबा सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.