प्रशासनाच्या उदासिनतेमुळेच एसटी महामंडळ तोट्यात
By Admin | Updated: August 13, 2014 00:47 IST2014-08-13T00:44:06+5:302014-08-13T00:47:47+5:30
नांदेड: एसटी तोट्यात सापडली असल्याचा आरोप एसटी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील गणाचार्य यांनी केला़

प्रशासनाच्या उदासिनतेमुळेच एसटी महामंडळ तोट्यात
नांदेड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामधील भंगार झालेल्या गाड्या, कर्मचाऱ्यांचे प्रश्न याकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने आज एसटी तोट्यात सापडली असल्याचा आरोप एसटी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील गणाचार्य यांनी केला़
एस़ टी़ कामगार सेनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड येथे मंगळवारी आयोजित प्रादेशिक मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़सुभाष वानखेडे तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, प्रथम महापौर सुधाकर पांढरे, माजी आ़ सुभाष साबणे, डॉ़ बी़ डी़ चव्हाण, संयोजक विनोद चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करण्यात आले़
एसटी प्रशासनाकडून एसटी कामगारांच्या दैनंदिन समस्या, गाड्यांची स्थिती याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एसटी कामगारांचे प्रश्न मांडणाऱ्या संघटनांकडे दुर्लक्ष करीत मान्यता प्राप्त संघटनेला पोसण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे आरोप त्यांनी केला़
नियमाने सात लाख किलोमीटर वापरानंतर बसेस प्रवासी वाहतूकीसाठी वापरू नयेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत १२ ते १३ लाख किलोमीटरपर्यंत बसेस वापरून प्रवाशासह चालक आणि वाहकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे गणाचार्य यांनी सांगितले़
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन करारातील थकबाकी अद्यापपर्यंत मिळालेली नाही़ कर्मचाऱ्यांच्या छोट्या - छोट्या चुकांवरदेखील तत्काळ कारवाई केली जाते, परंतू त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास वर्षानुवर्षे लावली जातात़ एसटीमध्ये अनेक संघटना कार्यरत असूनदेखील मान्यताप्राप्त संघटनेस झुकते माप देण्याचे काम प्रशासन करीत असल्याचेही ते म्हणाले़
प्रास्ताविक संयोजक विनोद चिखलीकर यांनी केले़ उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)