छत्रपती संभाजीनगर : एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यात बहुतांश बस दहा वर्षांपेक्षा जुन्या झाल्याने दुरुस्ती खर्च वाढला आहे. परिणामी, राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून, संचित तोटा एक हजार कोटींवर पोहोचल्याची माहिती विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष माधव कुसेकर यांनी दिली.
एसटी विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभाग नियंत्रक यांच्यासोबत त्रैमासिक आढावा घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर गुरुवारी शहरात आले. बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींसोबत चर्चा करताना एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत भाष्य केले. एसटी बसच्या प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे. परिणामी, उत्पन्नात घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते इतर खर्चावर याचा परिणाम होत आहे. शासनातर्फे एसटी प्रवाशांना मोठ्या सवलीत देऊ केल्या. त्या सवलीतसह हा तोटा आहे. रक्षाबंधन, तसेच अन्य यात्रा, उत्सवादरम्यान विभागाला चांगले उत्पन्न मिळाल्याचे सांगत ही एसटीची जमेची बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या बस खरेदी बंद, असलेल्या जुनाटमहामंडळानी ७ वर्षांपासून नवी बस खरेदी बंद केली आहे. त्याशिवाय विभागाकडे असलेल्या बस जुनाट झाल्याने दुरुस्ती खर्चावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होत आहे. त्याशिवाय, विभागाने ओलेक्ट्रा कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. एसटीला ५१५० ईव्ही मिळणार होत्या. या कंपनीकडून विभागाला प्रतिकिलोमीटर १५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे कुसेकर यांनी सांगितले.
भाडेतत्त्वावरच्या बस बंदओलेक्ट्राच्या बससोबतच विभागाने यापूर्वी शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. या भाडेतत्त्वावरील बसचा मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. यामुळे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापुढे भाडेतत्त्वावर बस घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.