श्रीकृष्णनगरवासीयांना बाराही महिने टँकरचेच मिळते पाणी
By Admin | Updated: July 11, 2014 01:04 IST2014-07-11T00:48:56+5:302014-07-11T01:04:34+5:30
औरंगाबाद : सिडकोच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करायचे नाही, ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नाही, म्हणून नगर परिषदेची संयुक्त मागणी झाली आहे.

श्रीकृष्णनगरवासीयांना बाराही महिने टँकरचेच मिळते पाणी
औरंगाबाद : सिडकोच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करायचे नाही, ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नाही, म्हणून नगर परिषदेची संयुक्त मागणी झाली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या तरी पाणी, विकासकामांचे काय होणार याबद्दल रहिवासी संभ्रमावस्थेत आहेत.
ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेल्या भागाच्या विकासासाठी नगर परिषदच व्हावी यासाठी सर्वांनी पाठपुरावा केला आहे. श्रीकृष्णनगरातील रहिवाशांना बाराही महिने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सफाई कर्मचारी या भागात येत नसल्यामुळे मोकळ्या प्लॉटवर केरकचरा टाकला जात आहे. ड्रेनेज लाईन नसल्यामुळे प्रत्येक घरासाठी सेफ्टी टँक असून त्याचे पाणी रस्त्यावर, रिकाम्या प्लॉटवर साचून राहते. या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आमदार विकास निधीतून रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेतले आहे.
विकासासाठी प्रयत्न
पाणीपुरवठ्यासह विकासकामांच्या विविध योजना ग्रामपंचायतीने आखल्या होत्या. विकासासाठी नगर परिषदेत देवळाई परिसराचा समावेश होऊन संयुक्त सातारा- देवळाई नगर परिषद झाल्यावर विकास लवकर होणार आहे. त्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. -करीम पटेल, सरपंच
रस्तेही मजबूत हवेत
मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था दूर होणार आहे; परंतु अंतर्गत रस्त्यांचेही काम व्हावे.
-संजय बोरा, रहिवासी
खेळाचे मैदान करा
कॉलनीत मोकळी जागा असून, तेथे खेळाचे साहित्य देऊन ते विकसित करावे. त्यामुळे मुले आणि वयोवृद्धांची सोय होईल.
-दुर्गेश कुलकर्णी,
रहिवासी
पाण्याचे नियोजन नाही
पिण्याच्या पाण्यासाठी १२ महिने नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात परिसरातील बोअर तळ गाठत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होते. कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
-कविता जंगले, रहिवासी
विकासाचा प्रश्न
नगर परिषद स्थापन होत नाही तोपर्यंत मूलभूत सोयी आणि विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत.
-दत्तात्रय घुगे, रहिवासी