तरूणाच्या शोधासाठी पथक दिल्लीला रवाना
By Admin | Updated: July 7, 2014 00:32 IST2014-07-06T23:54:30+5:302014-07-07T00:32:33+5:30
वसमत : आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी दिल्लीला गेलेला वसमतचा तरुण १५ दिवसांपासून बेपत्ता आहे.

तरूणाच्या शोधासाठी पथक दिल्लीला रवाना
वसमत : आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी दिल्लीला गेलेला वसमतचा तरुण १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. ज्यांच्याकडे पैसे गुंतवले त्याच लोकांनी त्याचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची तक्रार युवकाच्या भावाने केली आहे. या तरुणाच्या शोधार्थ वसमत पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
वसमत येथे औषधी विक्रीचा व्यवसाय करणारा तरुण कैलास यतीराजम नल्लेवार (वय ३३) या युवकाने एका आॅनलाईन योजनेत पैसे गुंतवले होते. गुंतवलेले पैसे मुदतीत परत न आल्याने पैसे वसूल करण्यासाठी सदर तरुणाने दिल्ली गाठली. २३ जून रोजी दिल्लीला पोहोचल्यापासून सदर तरुणाचा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. हा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंबियांची शंका बळावली आहे.
या प्रकरणी तरुणाचा भाऊ कालीदास नल्लेवार (वय ३७) याने वसमत पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत कैलास याने आरोपी मनिष शर्मा व गौतम यांच्याकडे पैसे गुंतवले होते. पैसे परत आणण्यासाठी कैलास गेला असता आरोपींनी त्याचा खून करण्याच्या इराद्याने पळवून नेल्याची तक्रार दिली आहे.
या तक्रारीवरून वसमत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून ५ जुलै रोजी वसमत पोलिसांचे पथक पहाडगंज दिल्ली भागात रवाना झाले आहे.
या पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, फौजदार रामेश्वर कायंदे व अन्य कर्मचारी सहभागी आहेत.
आॅनलाईन स्किममध्ये पैसे गुंतवून दुप्पट- तिप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र आता पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेला तरुणच बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने परिसरातील खळबळ उडाली आहे. वसमत पोलिसांचे दिल्लीला पोहोचलेले पथक या प्रकरणाचा छडा कसा लावते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)
आॅनलाईन स्किममध्ये पैैसे तिप्पट देण्याचे आमिष
वसमत येथील तरुण कैलास यतीराजम नल्लेवार (३३) या युवकाने एका आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे मुदतीत परत न आल्याने पैसे वसूल करण्यासाठी सदर तरुणाने दिल्ली गाठली.
२३ जून रोजी दिल्लीला पोहोचल्यानंतर तरुणाचा त्याच्या कुटूंबियांशी संपर्क झाला नसल्याने हा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंंबियांची शंका.
गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी कैलास दिल्लीत गेला असता आरोपींना त्याचा खून करण्याच्या इराद्याने पळवून नेल्याची तक्रार युवकाच्या नातेवाईकानी पोलिसांत दिली.
बेपत्ता युवकाच्या शोधासाठी वसमत पोलिसांचे पथक दिल्लीला पोहोचले असून या प्रकरणाचा छडा कसा लावते? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.