भरारी पथकाने जप्त केले
By Admin | Updated: October 14, 2014 00:41 IST2014-10-14T00:27:08+5:302014-10-14T00:41:03+5:30
औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सिडकोतील टाऊन सेंटर येथे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी वीणा खरे (वाघमारे) यांच्या घरातून १ लाख ३८ हजार रुपये जप्त केले.

भरारी पथकाने जप्त केले
औरंगाबाद : निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सिडकोतील टाऊन सेंटर येथे राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी वीणा खरे (वाघमारे) यांच्या घरातून १ लाख ३८ हजार रुपये जप्त केले. ही कारवाई सोमवारी दुपारी केली.
निवडणूक विभागाचे फिरते भरारी पथक क्रमांक-२ हे गस्तीवर असताना टाऊन सेंटर येथील वीणा खरे यांच्या घरासमोर महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पथकाला दिसली. शिवाय बंगल्यात काही महिलाही उपस्थित असल्याचे दिसले.
पथकप्रमुख एस.के. गाजुलवाड, ए.आर. लांडे, सहायक ए.वाय. पवार, पोलीस कर्मचारी आर.के. गायकवाड, एस.एम. चव्हाण, एन.आर. सूर्यवंशी, आर.के. गायकवाड, वाहनचालक सय्यद मजहर, व्हिडिओग्राफर के.एस. जाधव, करण बन्सवाल यांनी तेथे जाऊन खरे यांच्या घराची इन कॅमेरा झडती घेतली. त्यावेळी वरच्या मजल्यावर आढळलेल्या एका पिवळ्या रंगाच्या बॅगमध्ये १ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांची लेबर सप्लायर्सची एजन्सी आहे.
या एजन्सीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि त्यांचा बोनस वाटप करण्यासाठी ही रक्कम आणली आहे. यातील काही रक्कम आधीच आणलेली आहे, तर ५३ हजार रुपये बँकेतून काढल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटांना ३ टक्के व्याज दराने रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ब्रिजवाडी येथील बचत गटाच्या या महिला येथे आल्याचे त्यांनी सांगितले. पथकप्रमुखांनी यावेळी एका महिलेचा जबाबही नोंदविला. त्यानंतर वीणा खरे, तुषार वाघमारे, नितीन वाघमारे यांच्यासमोर ही रक्कम जप्त करण्यात आली.