स्पॉट रिपोर्टिंग : मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना भरधाव जीपने चिरडले, दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 18:24 IST2017-09-16T18:19:01+5:302017-09-16T18:24:58+5:30

मॉर्निंग वॉक करणा-या चौघांना भरधाव स्कॉर्पिओ जीपने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. इतर दोन जण जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात झाला

Spot Reporting: Four peoples dead in accident while morning walk, two injured | स्पॉट रिपोर्टिंग : मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना भरधाव जीपने चिरडले, दोन जण जखमी

स्पॉट रिपोर्टिंग : मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना भरधाव जीपने चिरडले, दोन जण जखमी

औरंगाबाद, दि. १६ : मॉर्निंग वॉक करणा-या चौघांना भरधाव स्कॉर्पिओ जीपने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. इतर दोन जण जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात झाला. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जीपचालक घटनास्थळावरून पसार झाला.

भागीनाथ लिंबाजी गवळी (५६), नारायण गंगाराम वाघमारे (६५), दगडूजी बालाजी ढवळे (६५) आणि अनिल विठ्ठल सोनवणे (४५, सर्व रा. हनुमान चौक, चिकलठाणा) अशी मृतांची नावे आहेत. तर विजय करवंदे आणि लहू तुळशीराम बकाल (४५) यांचा जखमींत समावेश आहे. चिकलठाणा येथील हनुमान चौकात राहणारे हे सहा जण मागील दोन ते तीन वर्षांपासून नियमित रोज पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान मॉर्निंग वॉकला केम्ब्रिज शाळेच्या चौकापर्यंत जातात. नेहमीप्रमाणे हे सर्व जण शनिवारी सकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास एकत्र फिरायला निघाले.

रस्त्याच्या डाव्या बाजूने जोडी जोडीने पाठोपाठ सहा जण जात होते. औरंगाबाद शहराकडून जालन्याकडे निघालेल्या सुसाट जीपने (क्र. एमएच-२७ एसी ५२८२) सर्वात मागे असलेल्या सोनवणे आणि वाघमारे यांना चिरडून त्यांच्यापुढे असलेल्या करवंदे आणि ढवळे यांना आणि नंतर गवळी आणि बकाल यांना जोराची धडक दिली. जीप पुढे रस्त्याच्या शेजारील पाण्यात सुमारे  चार ते पाच फूट खोल चारीत जाऊन फसली. धडक इतकी जोरदार होती की गवळी, ढवळे, वाघमारे आणि सोनवणे हे चिरडून शेजारील पाण्याच्या चारीत फेकल्या गेले. चौघांचाही जागीच मृत्यू झाला. 

करवंदे आणि बकाल बचावले
मध्यभागी रस्त्याच्या डाव्या बाजूला विजय करवंदे तर समोरच्या डाव्या बाजूला लहू बकाल होते. विजय यांना जीपने जोराची धडक दिल्याने ते उंच उडून सुमारे पंधरा ते वीस फूट चारीच्या पलीकडील शेतात फेकल्या गेले. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅ क्चर झाले आणि पाठ, कमरेला जबर मार लागला. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर लहू यांच्या पाठीला किरकोळ खरचटल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. 

अपघातानंतर मदतीसाठी धावले गावकरी...
या घटनेत लहू यांना किरकोळ मार लागल्याने ते दोन मिनिटानंतर उठले आणि अपघाताचे भीषण चित्र पाहून ते पुन्हा खाली बसले. तेव्हा त्यांना दूरवर पडलेले करवंदे दिसले. त्यांनी हात देऊन करवंदे यांना शेतातून रस्त्यावर आणले आणि मोबाइलवरून गावातील मित्रांना आणि पोलिसांना फोन केला. यावेळी शेतात निघालेले सुनील गोटे, अण्णा नवपुते आणि मॉर्निंग वॉक करणारे भगवान धोत्रे, संजय गोटे यांनी ही घटना पाहिली आणि ते मदतीसाठी धावले. रस्त्याशेजारी चार फूट रुंद आणि चार ते पाच फूट खोल चारी शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तुडुंब भरून वाहत होती. या चारीत दोन जण बुडाल्याने दिसत नव्हते, तर एक जण जीपच्या खाली चिखलात होता तर दुसरा चिखलात पालथा पडलेला होता. प्रथम नजरेस पडलेल्या या दोघांना चिखलातून बाजूला काढले.  चिखलामुळे त्यांचे चेहरेही ओळखता येत नव्हते.

दाताळ्याने चारीतून काढले दोघांना
चारीच्या पाण्यात बुडालेल्या दोन जणांना काढणे सोपे नसल्याने शेवटी अण्णा नवपुते यांनी  शेजारच्या शेतातून लाकडी दाताळे आणले. या दाताळ्याच्या सहाय्याने त्यांना पाण्यातून ओढून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांचाही घटनास्थळीच अंत झाला होता.  

पंधरा मिनिटांत पोलीस घटनास्थळी
माहिती मिळताच पंधरा मिनिटांत एमआयडीसी सिडको पोलीस घटनास्थळी पोहोचले, असे मदतकार्य करणाºया तरुणांनी सांगितले. पोलिसांनी जखमींना धूत हॉस्पिटलमध्ये तर मृतांना घाटीत नेले.  सहायक आयुक्त नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

 जीपचालक पसार
 अमरावती जिल्हा पासिंग असलेली ही जीप अचलपूर येथील ऋषी जैन यांची असल्याचे समजले. या जीपमध्ये किती लोक होते ही माहिती कोणालाही समजू शकली नाही. मात्र, अपघातानंतर जीपचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे जखमींनी सांगितले. पोलिसांनी जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, त्याचा शोध सुरू आहे.

शुगर ग्रुप म्हणून त्यांची ओळख
अपघातातील जखमी आणि मृत हे शुगर ग्रुप म्हणून ओळखला जाई. मृत वाघमारे हे सलूनच्या दुकानात, तर सोनवणे यांचे गावातच टेलरिंगचे दुकान आहे. गवळी रिक्षाचालक आणि ढवळे हे निवृत्त कामगार होते. जखमी करवंदे कापड दुकान चालवितात तर बकाल हे शेतकरी आहेत.
 

Web Title: Spot Reporting: Four peoples dead in accident while morning walk, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.