क्रीडा प्रशिक्षणांचाही पडला ‘दुष्काळ’ !
By Admin | Updated: May 6, 2015 00:29 IST2015-05-06T00:20:41+5:302015-05-06T00:29:55+5:30
महेश पाळणे, लातूर उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, क्रीडा प्रशिक्षणांचा मोसम. विविध खेळांच्या क्रीडा प्रशिक्षणांची रेलचेल या दरम्यान असते.

क्रीडा प्रशिक्षणांचाही पडला ‘दुष्काळ’ !
महेश पाळणे, लातूर
उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, क्रीडा प्रशिक्षणांचा मोसम. विविध खेळांच्या क्रीडा प्रशिक्षणांची रेलचेल या दरम्यान असते. त्यातच शासनाच्या कृपेवरून खेळाच्या संख्येने शंभरीच्या वर संख्या गाठली आहे. मात्र लातूर शहरात व जिल्ह्यात मोजक्याच खेळांच्या संघटना उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत आहेत. त्यामुळे भर दुष्काळातही क्रीडा प्रशिक्षणांचा दुष्काळ क्रीडा क्षेत्राला जाणवत आहे.
क्रीडा संघटना व क्रीडा कार्यालयामार्फत उन्हाळ्यात जास्त कालावधीचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतात. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातूनच खेळाडूंच्या कौशल्याचा विकास होतो. त्यांच्यातील आत्मविश्वास व अचूकताही यातूनच वाढते. उत्तम खेळाडू तयार करायचे असल्यास यासारख्या शिबिरांची आवश्यकता असते. शारीरिक क्षमता, सांघिक भावनाही यातून वृद्धिंगत होते. शहरातील व जिल्ह्यातील चित्र पाहता दहा ते बारा खेळांच्या माध्यमातूनच या शिबिराचे आयोजन आहे. त्यातील क्रीडा कार्यालयामार्फत चार, संघटनेमार्फत अवघ्या तीन तर उर्वरित प्रशिक्षणात विविध खाजगी क्रीडा मंडळे व क्लबचीच संख्या आहे. त्यामुळे क्रीडा संघटनेच्या मुख्य उद्देशाला हुलकावणी मिळाली आहे. केवळ संघ पाठविणे व स्पर्धा घेणे यावरच जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांचा रस दिसतो. यामुळे खेळाडू घडविण्याच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत आहे.