क्रीडासंकुलाची डागडुजी रखडली !
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:34:20+5:302014-10-29T00:44:32+5:30
उस्मानाबाद : येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल डागडुजीकामी निधी उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणीकडे शहरवासीयांनी पाठ फिरविली आहे़

क्रीडासंकुलाची डागडुजी रखडली !
उस्मानाबाद : येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल डागडुजीकामी निधी उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणीकडे शहरवासीयांनी पाठ फिरविली आहे़ क्रीडा संघटनांनी तर ठेंगाच दाखविला असून, काही नागरिकांसह युवकांनी सदस्य नोंदणी केली आहे़ विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाच्या कामालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही़
जिल्हा क्रीडा संकुलाच्या डागडुजीसाठी छदामही न देण्याचा निर्णय घेत शासनाने स्वउत्पन्न वाढविण्याच्या सूचना काही वर्षापूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयांना दिल्या होत्या़ त्यामुळे क्रीडा संकुल समितीने काही नियम करून सदस्य नोंदणीची योजना आखली होती़ ज्येष्ठ नागरिकांना ५० रूपये, युवकांना १०० ते १५० रूपयांसह इतर दर आकारण्यात आले होते़ तर क्रीडा संघटनांसाठीही वेगवेगळे दर आकारण्यात आले होते़ शिवाय नोंदणीनंतर सकाळी व संध्याकाळी ठरलेल्या वेळेतच मैदानावर येण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या़ येथे उपस्थित सुरक्षा रक्षकांमार्फत ओळखपत्राची तपासणी करून संबंधितांना मैदानावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ या निर्णयाची १ जून २०१४ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे़ या निर्णयानंतर ज्येष्ठ नागरिकांसह युवक, बॅडमिंटन पटू, व्यायमशाळेत येणाऱ्या युवकांनी सदस्य नोंदणी केली़ मात्र, बहुतांश वेळा क्रीडांगणाचा वापर करणाऱ्या क्रीडा संघटनांनी या निर्णयाला विरोध करीत आकारलेला दर देण्यास विरोध दर्शविला़ क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या़ मात्र, त्यातून योग्य तो मार्ग न निघाल्याने संघटनांनी अद्यापही नोंदणीकडे पाठ फिरविली आहे़ सदस्य नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने क्रीडा संकुलातील डागडुजीची अनेक कामे रखडली असून, मुलभूत सुविधाही अद्यापपर्यंत येथे येणाऱ्या खेळाडुंसह ज्येष्ठांना उपलब्ध करून दिलेल्या नाहीत़ उस्मानाबाद शहरात एकमेव असलेल्या क्रीडा संकुलाची डागडुजी करून खेळाडुंना चांगले क्रीडांगणे उपलब्ध करून देण्यासाठी समिती अध्यक्षांसह क्रीडा कार्यालयातील अधिकारी, क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे़ शहरातील नागरिकांना सोबत घेवून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही क्रीडाप्र्रेमी नागरिकांसह खेळाडुंमधून होत आहे़ (प्रतिनिधी)