क्रीडा संकुलाचं रुपडं ‘बिघडलं’
By Admin | Updated: June 5, 2017 00:23 IST2017-06-05T00:21:43+5:302017-06-05T00:23:01+5:30
बीड : शहरात एकमेव क्रीडा संकुल असल्याने खेळाडू येथे शहरासह जिल्ह्यातून खेळण्यासाठी येतात.

क्रीडा संकुलाचं रुपडं ‘बिघडलं’
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात एकमेव क्रीडा संकुल असल्याने खेळाडू येथे शहरासह जिल्ह्यातून खेळण्यासाठी येतात. यातच मागील काही वर्षांपासून खेळांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे खेळाडूही वाढले आहेत. या खेळांचा सराव करण्यासाठी सकाळी व सायंकाळी क्रीडा संकुलात गर्दी होत असते. गर्दीच्या दृष्टीने हे संकुलातील जागा अपुरी पडते. जशी जागा मिळेल त्याठिकाणी नाईलाजास्तव खेळाडूंना सराव करावा लागतो. वारंवार जागेची मागणी करूनही याकडे क्रीडा कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने आता खेळाडूही मागणी करून थकले होते.
खेळातील तज्ज्ञ आणि जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीने उपलब्ध जागेतच खेळाडूंना कशाप्रकारे चांगल्या सुविधा देता येतील या दृष्टीकोणातून विचार केला. त्याप्रमाणे एक प्रस्ताव दाखल केला. त्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरीही मिळाली. मैदानावर लॉन तयार करणे, लॉनला पाणी देण्यासाठी स्प्लींकनरची व्यवस्था, वॉकिंग करणाऱ्यांसाठी ट्रॅक, संकुलात पार्किंगची व्यवस्था, अंतर्गत रस्ते बनविणे, जाळी बसविणे अशा अनेक कामांचा समावेश होता. ही कामे करण्यास प्रत्यक्षात सुरूवातही झाली होती.
तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यासाठी दिल्याचे सांगितले होते. तसेच आपण या कामावर नजर ठेवत असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुलाचे काम झाले हे खरे असले तरी किती निकृष्ट दर्जाचे झाले, हे क्रीडा संकुलातील परिस्थिती पाहिल्यावरच लक्षात येते.
अधिवेशनात लक्षवेधी
विधान परिषद सदस्य आ. अमरसिंह पंडित यांनी दोन वर्षांपूर्वी क्रीडा कार्यालयातील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठविला होता. याचीच दखल घेत तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांची चौकशी लागली होती. यावेळीही अधिवेशनात संकुलाचा मुद्दा लावून धरण्याची मागणी होत आहे.