बंदमध्ये शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

By Admin | Updated: October 7, 2016 01:31 IST2016-10-07T00:48:28+5:302016-10-07T01:31:56+5:30

औरंगाबाद : शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळा बंद आंदोलनाला खाजगी अनुदानित,

Spontaneous participation in schools in the band | बंदमध्ये शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

बंदमध्ये शाळांचा उत्स्फूर्त सहभाग


औरंगाबाद : शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. शाळा बंद आंदोलनाला खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेक पालकांनी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून आपल्या मुलांना शाळेत पाठविले नाही, तर काही शाळांनी प्रार्थना झाल्यानंतर शाळा सोडून दिल्या. शासनाचे अनुदान न घेणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मात्र, आज नियमित सुरू होत्या.
मंगळवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा नेला होता. शासनाने अनुदानास पात्र घोषित व अघोषित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान न देता शाळांना नियमानुसार अनुदान द्यावे, या मुख्य मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठवाड्यातील शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शिक्षक व पोलीस जखमी झाले. अनेक शिक्षकांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली.
काल मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, मराठवाडा मुख्याध्यापक संघाने संयुक्तपणे गुरुवारी शाळा बंदचे आवाहन केले. त्यास आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रामुख्याने मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांच्या अनेक शाळा कडकडीत बंद होत्या. काही शाळांनी मात्र बंदमध्ये सहभाग घेतला नव्हता. दुपारनंतर अशा शाळा बंद ठेवण्यात आल्या. अनेक पालकांनी धावपळ टाळण्यासाठी मुलांना स्वत:हूनच शाळेत पाठविले नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावलेली होती. त्या शाळांनीही दुपारनंतर मुलांना घरी पाठवून बंदमध्ये सहभाग नोंदविला.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, मुख्याध्यापक संघाचे मनोहर सुरगडे, युनूस पटेल व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे मागणी केली की, शिक्षकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले वेगवेगळे गुन्हे रद्द करा व त्यांची तात्काळ मुक्तता करावी, चुकीच्या पद्धतीने शिक्षकांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी.
मुख्याध्यापक संघाचे नेते मनोहर सुरगडे यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यात ९५ टक्के, तर राज्यात ९० टक्के शाळा बंद असल्याचा दावा केला. काल बुधवारी शाळा बंदचे आवाहन करणारे पत्रक राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील शाळांना बंदचे आवाहन केल्यामुळे अल्प कालावधीतही शाळा बंद आंदोलन यशस्वी झाले, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेणाऱ्या शिक्षकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करून शिक्षकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत, अटकेतील शिक्षकांना मुक्त करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रभारी जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांना सादर केले. शिक्षक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष नामदेव सोनवणे, विठ्ठल बदर, श्याम राजपूत, सुधाकर कापरे, दत्ता पवार, रावसाहेब अधाने, विलास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, संदीप चव्हाण, संजय गोगे, अंकुश पांडे आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रभारी जिल्हाधिकारी सोरमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय देण्याऐवजी अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे धोरण असताना, जाचक अटी लावून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. दडपशाहीच्या माध्यमातून शिक्षकांचा आवाज बंद करणाऱ्या या शासनाचा शिक्षक सेना निषेध करीत आहे.

Web Title: Spontaneous participation in schools in the band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.