नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !
By Admin | Updated: April 8, 2015 00:53 IST2015-04-08T00:27:49+5:302015-04-08T00:53:58+5:30
प्रताप नलावडे , बीड अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी

नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !
प्रताप नलावडे , बीड
अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या छोट्याशा गावात हा सप्ताह सुरू आहे. दररोज एक लाखापेक्षा भाविक या सप्ताहात हजेरी लावत असून ९ एप्रिलला या सप्ताहाच्या समारोपासाठी तीन लाखापेक्षाही अधिक भाविक हिंगणी खुर्दमध्ये दाखल होणार आहेत.
सामाजिक सलोखा राखणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या सप्ताहातून होत असल्याचे न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री आवर्जून सांगतात. संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची व्याप्ती आता इतकी वाढली आहे की यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा सप्ताह गेली ८२ वर्षापासून करत आहेत.
भगवान गडावरून सप्ताहाच्या आयोजनासाठी नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याची तयारी करायची, अशी परंपरा चालत आली आहे. गेली नऊ वर्षापूर्वी हिंगणी खुर्द गावाला हा मानाचा नारळ मिळाला होता. तेव्हापासून गावकरी सप्ताहाच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी वर्गणी गोळा करतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेतीशी याचा मेळ घातला. एका एकरासाठी तीन हजार रूपये वर्गणी स्वखुशीने गावकऱ्यांनी दिली. नऊ वर्षात चाळीस लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा करण्यात आली. यातूनच हा खर्च भागविला जातो.काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केली आहे. संभाजी चव्हाण यांनी २५ किंव्टल साखर, राजेंद्र मुंडे यांनी ५१ किंव्टल गहु, अशोक लोढा यांनी तेलाचे डबे असे जमेल तसे प्रत्येकाने या सप्ताहाचा भार उचलला आहे. रक्कम कमी पडली तर भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज स्वत: खर्च करतात.दररोज भजन, कीर्तन, रामकथा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वत: नामदेव महाराज शास्त्री जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष देतात. हिंगणी हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा कच्च्या रस्त्यावर मोटार गाड्यांची रांग लागली आहे. २५ एकराच्या परिसरात सप्ताह साजरा केला जात आहे. १० एकर परिसरात मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमासाठी, भोजनासाठी आणि स्वयपाकासाठी वेगवेगळे विभाग केले आहेत.संपूर्ण गावातील लोक नियोजनात सहभागी तर झाले आहेतच, परंतु बाहेर गावावरून आलेल्या लोकांचीही लगबग सुरू आहे.