ट्रान्सफॉर्मर देण्याचा वेग तिपटीने वाढला
By Admin | Updated: November 2, 2014 00:22 IST2014-11-02T00:09:14+5:302014-11-02T00:22:43+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे.

ट्रान्सफॉर्मर देण्याचा वेग तिपटीने वाढला
औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. शेतकरी आणि गावकरी डी.पी. मिळविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात खेट्या मारीत आहेत. याविषयी लोकमतने, हॅलो औरंगाबादमध्ये १ नोव्हेंबरच्या अंकात ‘बंद ट्रान्सफॉर्मरचा शॉक’ या मथळ्याखाली बातमी आणि शॉक हे विशेष पान प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम शनिवारी महावितरणच्या कारभारावर होताना दिसून आला. वीज ग्राहकांना ट्रान्सफॉर्मर देण्याचा मंदावलेला वेग चक्क तिपटीने वाढला.
जिल्ह्यातील औरंगाबाद आणि कन्नड विभागात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज ग्राहकांना १४ ट्रान्सफॉर्मर वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात सध्या शेकडो ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. महावितरणच्या दोन्ही विभागांमध्ये बंद डीपींचा खच पडला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करण्यास महावितरण कमी पडत आहे. विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जमा केल्यानंतर एक ते दीड महिना मिळत नाही. सिंगल फेज आणि थ्री फेजचे ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी वीज ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
महावितरणकडून रोज चार ते पाच ट्रान्सफॉर्मर ग्राहकांना देण्यात येते होते; पण शनिवारी कन्नड विभागातातून ६३ केव्ही- ३ ट्रान्सफॉर्मर, १०० केव्ही- ३, औरंगाबाद विभागातून ६३ के.व्ही.- ५, १०० केव्ही- ३, असे १४ ट्रान्सफॉर्मर वितरित करण्यात आले. ही माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिली.
स्पष्टीकरण आणि आवाहन
गेल्या काही दिवसांत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये डीपी दुरुस्त करणारे विविध कंपन्यांचे कर्मचारी निवडणूक आणि दिवाळीमुळे सुटीवर गेले होते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नव्हता. परिणामी, तफावत निर्माण झाली होती. आजपासून सर्व कामकाज पूर्ववत होत आहे. चार-पाच दिवसांत डीपीचा प्रश्न मार्गी लागेल, असे स्पष्टीकरण अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिले.
डीपीवर विजेचा अतिरिक्त दाब वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडतात. दाब वाढू नये यासाठी ग्राहकांनी आकडे टाकून वीजचोरी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.