पर्यटनाच्या राजधानीतील पोलिसांना विशेष प्रशिक्षण देणार
By Admin | Updated: September 24, 2016 00:29 IST2016-09-24T00:24:37+5:302016-09-24T00:29:35+5:30
शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ३५ कर्मचाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेल व इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) कडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे

पर्यटनाच्या राजधानीतील पोलिसांना विशेष प्रशिक्षण देणार
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृृष्णेश्वर मंदिर, बीबीका मकबरा, पितळखोऱ्याच्या लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक औरंगाबादला येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि अडीअडचणीच्या वेळी त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांनी आंग्ल भाषेत संवाद कसा साधावा, शिष्टाचार कसा पाळावा, याबाबत शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ३५ कर्मचाऱ्यांना एका पंचतारांकित हॉटेल व इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) कडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त म्हणाले की, २०१७ हे पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच अजिंठा-वेरूळ महोत्सव, सार्क परिषद औरंगाबादेत होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ३५ पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी एक पंचतारांकित हॉटेल आणि आयएचएम यांनी संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी आणि ८ व ९ आॅक्टोबर रोजी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलिसांना इंग्रजी भाषेत पर्यटकांशी सहज संवाद साधता यावा, तसेच त्यांच्याशी बोलताना देहबोली कशी असावी, त्यांच्याशी शिष्टाचार कसा पाळावा, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी वैजापूरचे सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली. तर हे प्रशिक्षण तयार करण्यापूर्वी विदेशातील पर्यटकांकडून सूचना घेण्यात आल्या. पत्रकार परिषदेला अधिष्ठाता अलोक अवस्थी, सतीश जयराम, अवेकसिंग गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती उपस्थित होते.