हिंगोलीत ‘आषाढी’साठी विशेष तयारी
By Admin | Updated: July 9, 2014 00:06 IST2014-07-08T23:42:38+5:302014-07-09T00:06:59+5:30
हिंगोली : शहरातील दोन्ही विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे.
हिंगोलीत ‘आषाढी’साठी विशेष तयारी
हिंगोली : शहरातील दोन्ही विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रामुख्याने देवडा नगरातील मंदिरात बुधवारी पहाटेच्या जलाभिषेकापासून प्रारंभ होणारे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालणार आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता मंदिर समितीकडून सभामंडप टाकण्यापासून महाप्रसदाचे वाटप करण्यापर्यंत स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.
हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील विठ्ठल रूख्मिणीच्या मंदिराला ८० वर्षांचा कालावधी लोटला आहे. पुर्वी शहरात एकमेव असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रांगा लागत होत्या. पहाटेचा अभिषेक केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमास सुरूवात केली जायची.
दरम्यान, काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी लोटत होती. आता या मंदिराचे पुजारी थकल्यामुळे गतपाच वर्षांपासून मिरवणुकीसाठी हातातले काम सोडून कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही; पण भाविकांचा ओढा कमी झालेला नाही. खासकरून येथील मंदिरात महिलांची मांदियाळी असते. बुधवारी पहाटे ५ वाजता अभिषेक केल्यानंतर विठ्ठल रूख्मिणी यांच्या मुर्तीला नवीन कपडे परिधान करण्यात येतील. तद्नंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले होईल, असे पुजारी लक्ष्मण गाजरे यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात बांधण्यात आलेल्या देवडा नगरातील मंदिराकडे भाविकांचा ओढा वाढलेला आहे. प्रत्येक एकादशीला भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मंदिर समितीने यंदा विशेष तयारी केली आहे. मंगळवारी दिवसभर मंदिर परिसरात सभा मंडप टाकण्याचे काम सुरू होते. एकादशीला दिवसभर कार्यक्रम होणार असल्याने स्टेज उभारण्यात आले आहे. समितीच्या वतीने तयारी पूर्ण केली असून बुधवारी सकाळी ६ वाजता जवळकर गुरू यांच्या हस्ते पुजा होणार आहे. यंदा पूजेचे यजमान नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आहेत. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता यंदा दर्शनासाठी व्यवस्था केली आहे. सोबत भाविकांना २ क्विंटल शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांना व्यवस्थीत दर्शन घेता यावे, सर्वांना महाप्रसादाचा लाभ मिळावा, यासाठी रेणुका नवदुर्गा समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धनंजय जोशी, देवदत्त देशपांडे, गजानन रत्नपारखी, मंगेश पांडे, स्मीता जोशी, स्वराली जोशी आदी मंडळी भजन गाणार आहेत. तद्नंतर रात्री ८ वाजता हरिपाठ होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी कुंडलिकराव झाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नर्सीत आषाढीनिमित्त जमणार भाविकांची मांदियाळी
नर्सी नामदेव : संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेल्या नर्सी नामदेव येथे ९ जुलै रोजी भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिंगोलीसह इतर जिल्ह्यातून हजारो भाविकांची नामदेव दर्शनासाठी मांदियाळी जमणार आहे.
९ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे भरणाऱ्या लाखों भाविकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होतो. नर्सी हे गाव संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव आहे. प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्सी नामदेव या गावी हिंगोली, परभणी, जिंतूर, सेनगाव, वाशिम, अकोला, बुलडाणा या तालुक्यातून जवळपास ५० ते ६० हजार भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. संत नामदेव महाराजांच्या मुर्तीस सकाळी ६ वाजता अॅड. प्रल्हाद उमरेकर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनबारीकरीता बॅरेकेटचे लाकडी कठडे बांधून व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच नामदेव मंदिर परिसरातील चारही पाण्याच्या मोठ्या टाक्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासून वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत राहावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षी बंदोबस्तासाठी ११ अधिकारी, ७४ कर्मचारी, १० शहर वाहतुक कर्मचारी, राज्य राखीव दलाचे ३० जवान या शिवाय बिनतारी यंत्रणा कॅमेरे यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक केंद्राअंतर्गत आरोग्य पथक स्थापन करून भक्तांची सेवा करणार असल्याचेही डॉ. परदेशी, डॉ. गोरे यांनी सांगितले. नर्सी व परिसरातील तरूण मंडळीही स्वंयसेवक म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान, आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविकांची सर्व खात्याकडून चांगली दखल घेतलेली दिसत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र याकडे गांभिर्याने बघितलेले नाही. येथील संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुतर्फा झालेल्या अतिक्रमणाचीही त्यात भर पडलेली आहे.
अनेकवेळा सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. (वार्ताहर)