कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान
By Admin | Updated: September 13, 2014 00:09 IST2014-09-13T00:04:18+5:302014-09-13T00:09:52+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान
हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी देशातील व राज्यातील विविध जल व पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एकमेव ‘कयाधू’ नदी ४० वर्षापूर्वी सातत्याने प्रवाहित होत होती. अलिकडच्या काळात किमान सहा महिने ती कोरडीच राहत आहे. या नदीच्या काठावर श्री संत नामदेव महाराजांचे समाधीस्थळ असलेले नर्सी हे गाव असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. श्री गुरूगोविंदसिंग यांच्या आदरस्थानी श्री संत नामदेव राहिल्यामुळे शीख धर्मियांचे हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेले हिंगोली शहरही याच नदीच्या तिरावर वसलेले आहे. त्यामुळे सदर नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी नर्सीपासून विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानासाठी कयाधू नदी पुनरुज्जीवीका समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या दृष्टीने रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्रसिंग राणा (तरुण भारत संघ राजस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्नचे जनक अभियंता सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया (मानवलोक, अंबाजोगाई), महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मोरे, सुनील जोशी (जलबिरादरी, पुणे), शांताराम पंदेरे, अभिजित घोरपडे, मुकुंद धाराशिवकर, डॉ. दत्ता देशकर, विनोद रापतवार यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्याचे ठरले आहे. या मोहिमेसाठी हिंगोलीतील कयाधू नदीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंग राणा, डॉ. सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया, शांताराम पंदेरे, सुनील जोशी ही तज्ज्ञ मंडळी १५ व १६ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती कयाधू नदी पुनरूज्जीविका कार्यक्रमाचे समन्वयक जयाजी पाईकराव यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)