छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागतो. या मानसिक तणावातून थोडेसे मुक्त होण्यासाठी कुटुंबासह सहल हा त्यावरील उपाय. मात्र, मागील आर्थिक वर्षात २१ अधिकाऱ्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांना चक्क ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावत, सुट्टी का घेतली नाही, याचा खुलासा करण्याचे आदेशही दिले. या नोटीस हातात पडल्यानंतर संबंधितांना धक्काच बसला.
आर्थिक अनियमितता, गंभीर चुका, कार्यालयात उशिरा येणे, न सांगता गैरहजर राहणे आदी अनेक कारणांवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ दिली जाते. मात्र, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी रजेवर न जाणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क नोटीस बजावली आहे. हक्काची रजा मिळत असताना रजा का घेतली नाही? कुटुंबासह बाहेरगावी फिरायला का जात नाही? अशी विचारणा या नोटिसीतून त्यांनी २१ अधिकाऱ्यांना केली आहे. आता खुलासा काय करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. दैनंदिन कामाच्या व्यापात सुट्टी घेणे झालेच नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.
नोटीस कोणाला बजावली?अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त सविता सोनवणे, विजय पाटील, लखीचंद चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, ऋतुजा पाटील, कार्यकारी अभियंता संजय कोंबडे, उपअभियंता संजय चामले, उपअभियंता विजय मोरे, वसंत भोये, अभियंता संदेश येरगेवार, जगदीश पाडळकर, मधुकर चौधरी, पूजा भोगे, किरण तमनर, काझी जावेद अहेमद.