सोयगाव ग्रामीण रुग्णालयच सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:43+5:302020-12-17T04:30:43+5:30

सोयगाव : एक लाख लोकसंख्येचा आरोग्य डोलारा सांभाळणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने येथील यंत्रणाच ...

Soygaon Rural Hospital on Saline | सोयगाव ग्रामीण रुग्णालयच सलाईनवर

सोयगाव ग्रामीण रुग्णालयच सलाईनवर

सोयगाव : एक लाख लोकसंख्येचा आरोग्य डोलारा सांभाळणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने येथील यंत्रणाच सलाईनवर आली असून जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सोयगाव ग्रामीण रुग्णालयात सातपैकी केवळ तीन आरोग्यसेवकांवर कामकाज सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याने येथील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. कोरोनाच्या सावटात येथील तीन कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करीत रुग्ण सेवा केली. मात्र, येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोयगाव ग्रामीण रुग्णालय या भागातील रुग्णांसाठी आधारवड आहे; परंतु या रुग्णालयात अद्यापपर्यंत शंभर टक्के पदभरती झाली नाही. त्यामुळे मनुष्यबळाचा अभाव येथे कायमच असतो. परिणामी, रुग्णांना तात्काळ सेवा मिळत नाही. कर्मचाऱ्यांसह रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथे कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी कंत्राटीवर काम करीत आहेत. एक कर्मचारी कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी असलेल्या आरोग्यसेविकेवर नॉन कोविड व कोविड रुग्णांचा देखील अतिरिक्त भार दिला आहे. त्यामुळे रुग्णालय यंत्रणा कोलमडली आहे.

---

दैनंदिन अहवाल वेळखाऊ

कोरोना संसर्गाच्या दैनंदिन अहवालावर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार जोर दिला जात आहे. हा अहवाल वेळेत शासनाकडे सादर करावा लागतो. त्यामुळे आरोग्यसेविकेला रुग्णसेवेबरोबरच या वेळखाऊ अहवालाचे काम करावे लागते; परंतु उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अखेर उपचाराची प्रतीक्षा करावी लागत आहे. हे विदारक चित्र थांबवायचे असेल तर अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Soygaon Rural Hospital on Saline