पावती असेल तरच सोयाबीनचे पंचनामे
By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-07T01:47:33+5:302014-08-07T02:04:29+5:30
कळंब : तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागील शुक्लकास्ट पिच्छा सोडण्यास तयार नाही. शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन उ

पावती असेल तरच सोयाबीनचे पंचनामे
कळंब : तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागील शुक्लकास्ट पिच्छा सोडण्यास तयार नाही. शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन उगवणीबाबत तक्रारी असताना कृषी विभागामार्फत मात्र केवळ खरेदी पावती असलेल्या सोयाबीन क्षेत्राचेच पंचनामे केले जात आहे. त्यामुळे घरगुती बियाण्यांचा वापर करणाऱ्या व पावती नसणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, कृषी विभागाने सरसकट बियाणे न उगवलेल्या क्षेत्राचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या जवळपास अर्ध्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होत असल्याने कळंब तालुका हा सोयाबीनचे कोठार बनला आहे. यावर्षी तालुक्यात जवळपास ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकतर पावसाळ्याचा पहिला जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या होत्या. यातच ७ जुलैला झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. या पेरलेल्या क्षेत्रावरील असंख्य शेतकऱ्यांच्या सोयाबीनची उगवणच झाली नव्हती. यासंदर्भात सहाशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. अजूनही शेतकरी तक्रार करतच आहेत. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे मोठे संकट असल्याने व अनेक नामांकित कंपन्याच्या बियाणांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांसह प्रशासनही हवालदिल झाले होते. तद्नंतर कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जानुसार गावनिहाय पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.
परंतु कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फक्त ज्या शेतकऱ्यांनी खरेदी पावत्या जोडल्या आहेत, त्यांच्याच जमिनीचे पंचनामे सुरु केले आहेत. वास्तविक असंख्य शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानुसार घरगुती बियाण्याचा पेरणीसाठी वापर केलेला आहे. तसेच अज्ञानपणामुळे अनेकांनी पावती, लेबल, टॅग सांभाळून ठेवलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची ‘दाद न फिर्याद’ अशी अवस्था झाली आहे. (वार्ताहर)