सोयाबीन’ प्रश्नी शिवसेनेचा घेराव

By Admin | Updated: July 18, 2014 01:49 IST2014-07-18T00:35:30+5:302014-07-18T01:49:46+5:30

कळंब : सोयाबीनची उगवण होत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या असून, शेकडो एकरवरून हा आकडा हजारो एकरच्या पुढे चालला आहे.

Soya bean 'question Siege of Shivsena | सोयाबीन’ प्रश्नी शिवसेनेचा घेराव

सोयाबीन’ प्रश्नी शिवसेनेचा घेराव

कळंब : सोयाबीनची उगवण होत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या असून, शेकडो एकरवरून हा आकडा हजारो एकरच्या पुढे चालला आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरुवारी दिवसभर कळंब येथे ठाण मांडून होते. दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी या विषयावर शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कृषी कार्यालयात घेराव घालून प्रशासनाचे लक्ष वेधले.
तालुक्यात यावर्षी जवळपास ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीनचा वाटा मोठा आहे. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर चार- पाच दिवसांत त्याची उगवण होणे अपेक्षित असताना अनेक शेतकऱ्यांना बियाणांची उगवण होत नसल्याचा प्रकार लक्षात येऊ लागला आहे. या प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला असून, कृषी कार्यालयात तक्रारीचा पाऊस पडत आहे.
तालुक्यात कृषी विभागाच्या अंदाजापेक्षाही जास्त क्षेत्रावर सोयाबीन पेरा झाल्याचा अंदाज असून कन्हेरवाडी, बोर्डा, मोहा, खामसवाडी, ईटकूर, आडसूळवाडी इ. गावांतील असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नाही. कालपर्यंत २५ शेतकऱ्यांनी याविषयी तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी दिवसभर अनेक शेतकरी आपले गाऱ्हाणे घेऊन कृषी कार्यालयाकडे येत होते. त्यामुळे बुधवारपर्यंत शेकड्यावर असलेल्या हा आकडा हजारो एकरवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरणी केलेले बियाणे हे नामांकित कंपन्याचे असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये एका शासन अंगीकृत असलेल्या कंपनीसह तीन खाजगी बीजोत्पादक कंपन्याची नावेही आहेत. विशेषत: ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अहवालानुसार घरगुती बियाणांची पेरणी केली, त्याच्यापेक्षा नामांकित कंपन्याच्या प्रमाणित बियाणांच्या उगवणक्षमतेबाबत शेतकऱ्यांच्या अधिक तक्रारी दिसून येत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करावेत, संपूर्ण क्षेत्राचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली देऊन कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी अजित पिंगळे यांच्या समवेत विधी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शहाजी कणसे, अ‍ॅड. मंदार मुळीक, धनंजय मोरे, सचिन काळे, गोविंद चौधरी, अ‍ॅड. बी. एच. वाघमोडे, अ‍ॅड. पी. आर. सोनटक्के, अ‍ॅड. बी. ए. जाधवर, संतोष कदम, निलेश मुळीक, रविकांत शेटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
असे होणार पंचनामे
सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी वाढल्यानंतर भूम येथील उपविभागीय कृषी अधिकारी आर. पी. जाधव हे कळंब येथील तालुका कृषी कार्यालयात ठाण मांडून होते. यावेळी त्यांनी आलेल्या तक्रारीनुसार गावनिहाय याद्या तयार करून पंचनामे करण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. या पंचनाम्यावेळी तालुका कृषी कार्यालय, पं.स. कृषी विभाग, विद्यापीठ प्रतिनिधी, शेतकरी, संबंधित कंपन्याचा प्रतिनिधी यांचा समावेश राहणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या अडचणी
सोयाबीनची उगवणीबाबत तक्रार कशी व कोणाकडे करायची याबाबत शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांकडे खरेदी पावती त्यांचे वेस्टन, त्यावरील लेबल टॅग, लॉट नंंबर आदी माहिती नसते किंवा या गोष्टी हाती ठेवण्याची त्यांना सवयच नाही. यामुळे अशा नुकसानीच्या संदर्भात कायदेशीर बाब उत्पन्न झाल्यास शेतकऱ्यांच्या पदरी त्यांचे खरे असतानाही निराशा येण्याची शक्यता आहे.

Web Title: Soya bean 'question Siege of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.