पेरले पण उगवेनाच़़़
By Admin | Updated: July 28, 2014 00:53 IST2014-07-27T23:43:56+5:302014-07-28T00:53:02+5:30
पाथरी : यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासून पावसाने दगा दिला़ एका हलक्याशा पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली़

पेरले पण उगवेनाच़़़
पाथरी : यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासून पावसाने दगा दिला़ एका हलक्याशा पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली़ परंतु, पेरलेले उगवलेच नाही़ उगवलेले सुकून गेले आहे़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे़ ११ महिने पाऊस पडला़ परंतु, पावसाळ्यात पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे़
मागील अनेक वर्षानंतर यावर्षी जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले आहेत़ शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडलाच नाही़ थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसावरच या भागातील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली़ तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली़ परंतु, पावसाने सतत हुलकावणी दिलेल्यान खरिप हंगामातील ही दोन्ही महत्तवाची पिके आज शेतकऱ्यांच्या हातची गेली आहेत़ अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या ही झाल्या नाहीत़ शेतात लागवड केलेल्या कापसाच्या बॅगपैकी अर्धी तूट झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे़ खरिपाच्या पेरणीचा हंगाम संपून जात असला तरी या भागात मात्र पावसाचे नाव नाही़ जुलै महिना संपल्यानंतर शेतकऱ्यांना तिबार पेरणीसुद्धा करता येणार नाही़ मागील वर्षी ११ महिने पाऊस पडत राहिला़ मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले़ फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार नसल्याची चाहूल तेव्हा शेतकऱ्यांना लागली होती़ निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर आगामी वर्षे कसे काढावे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे़ (वार्ताहर)
परिस्थिती हतबल
बहुतांश गावांतील खरिपाच्या पेरण्या केल्यानंतरही पावसाअभावी पिके पूर्ण हातची गेली आहेत़ यावर्षीची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी वाईट काळ घेऊन येणारी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच यामुळे विस्कळीत होणार असल्याची प्रतिक्रिया बोरगव्हाण येथील नाना पाटील इंगळे यांनी दिली़
वाईट अवस्था
गोदाकाठच्या उमरा, कानसूर, गुंज, लिंबा, मुगल, अंधापुरी, गौंडगाव भागातही यावर्षी पावसाअभावी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे़ शेतकरी शेतामध्ये पाऊल टाकण्यासारखीसुद्धा परिस्थिती राहिली नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमरा येथील शेतकरी सुभाषराव कोल्हे यांनी दिली़
शेतात हिरवा चारा नाही
पावसाळ्याचे दिवस असूनही शेतामध्ये जनावरांना चारण्यासाठी हिरवा चारादेखील उगवला नाही़ शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपण्याच्या मार्गावर आहे़ यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये आपली जनावरे व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधण्याची वेळ पावसाअभावी येणार आहे़
पाण्याची समस्या उद्भवणार
यावर्षी जुलै संपला तरी पाऊस पडत नसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे़ आतापासूनच काही गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे़ वेळेत पाऊस पडला नाही तर पावसाळ्यातदेखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे़