साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:39:01+5:302014-06-08T00:53:40+5:30

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे.

Sowing will be done for the 10 hectare hectare area | साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

पाटोदा : तालुक्यात शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागत अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यात यंदाची खरीप पेरणी साडेसतराशे हेक्टरवर होणार असून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेअंतर्गत बी- बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे प्रभारी कृषी अधिकारी आर.एफ. शिदोरे यांनी सांगितले.
पाटोदा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. यंदा तरी पाऊस काळ चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे पूर्ण केलेली आहेत. तर काही शेतकऱ्यांची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. यंदा पाटोदा तालुक्यात साडेसतराशे हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते पुरविण्यात येणार आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
असे असले तरी शासनाकडून मात्र बी- बियाणांच्या योजनांसंदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना कृषी कार्यालयाला प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले जाते. सध्या मान्सून केरळात दाखल झाला असून येत्या काही दिवसांतच मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल, असे संकेत हवामान खात्याने नुकतेच दिले. यामुळे शेतकरी मोठ्या लगबगीने शेतातील कामे उरकते घेत आहे.
कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये चालू वर्षी तालुका कृषी कार्यालयांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमामधून गतिमान वैरण विकासासाठी २०० हेक्टर, कापूस विकासासाठी ५० हेक्टर क्षेत्राला लाभ दिला जाणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी २०० हेक्टर, कडधान्य १०० हेक्टर तर एन.एम.ओ.पी. अंतर्गत सोयाबीन १०० हेक्टरसाठी लाभ दिला जाणार आहे. कोरडवाहू अभियानात तळेपिंपळगाव या गावाची निवड केली असून या अंतर्गत कापूस, मूग पिकास पन्नास हेक्टर आणि कापूस, उडीद पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना लाभ दिल्या जाणार आहे.
कोरडवाहू क्षेत्र वगळता सर्वांसाठी बी- बियाणे आणि खते या योजनेअंतर्गत दिल्या जातात. कापूस बियाणे लाभार्थी शेतकऱ्यास स्वत: खरेदी करावे लागतात. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेमुळे थोडाबहुत धीर आला आहे. मात्र या योजनेसंदर्भात प्रभारी कृषी अधिकारी आर.एम. शिदोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना अद्यापपर्यंत कार्यालयास मिळालेल्या नाहीत. वरिष्ठांचे आदेश व सूचनांनुसार सदरील योजना राबविली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याबाबत प्रगतशील शेतकरी पी.एस. पवार म्हणाले की, शासन राबवित असलेल्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर बी- बियाणे दिले तरच या योजनेचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sowing will be done for the 10 hectare hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.