केवळ १ लाख हेक्टरवर पेरणी
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-21T00:13:05+5:302014-07-21T00:27:11+5:30
विलास चव्हाण, परभणी खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़
केवळ १ लाख हेक्टरवर पेरणी
विलास चव्हाण, परभणी
खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़
गतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने खरीप हंगामाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण झाली होती़ यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतु, पाऊस पडत नसल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत़
जिल्ह्यातील जिंतूर, पालम, सेलू आदी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला प्रारंभ केला आहे़ परभणी तालुक्यात सोयाबीन २ हजार ३३४ हेक्टर, गंगाखेड २ हजार २५० हेक्टर, जिंतूर ५ हजार ४५० हेक्टर, पूर्णा २ हजार ७०० हेक्टर, पालम १५०० हेक्टर, सेलू २ हजार ९७२ हेक्टर, सोनपेठ ४ हजार हेक्टर, मानवत ६ हजार १२० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर कापसाची लागवड परभणी ३ हजार ९१३ हेक्टर, गंगाखेड ३ हजार ७७० हेक्टर, जिंतूर ८ हजार ५०० हेक्टर, पूर्णा ७ हजार ५५० हेक्टर, पालम ६ हजार हेक्टर, सेलू १५ हजार २८० हेक्टर, सोनपेठ ३ हजार ६०० हेक्टर, मानवत ९ हजार ६१३ हेक्टर, पाथरी १ हजार ४२० हेक्टरवर लागवड झाली असून एकूण १ लाख १० हजार ८० हेक्टरवर खरीपाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़
५ लाख ३५ हजार हे़ क्षेत्र प्रस्तावित
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३५ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे़ आजपर्यंत केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ अद्यापही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणी झालीच नाही़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ अजून आठ दिवस पाऊस न पडल्यास खरिपाचे पीक जाण्याची शक्यता आहे़
मोठा पाऊसच नाही
जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे़ काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस पडला़ या पावसावरच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड केली आहे़ परंतु, मोठा पाऊस न पडल्यामुळे ही खरिपाची पिकेही धोक्यात येऊ शकतात़
उडीद व मूग हातचे गेले
मूग व उडीद या पिकाच्या पेरणीचा हंगाम गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे़ त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना उडीद व मुगाच्या शेंगा बघायला मिळणे अवघड होणार आहे़
मजुरावर उपासमारीची वेळ
खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने शेत मजुरांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे़ त्यामुळे आपले कुटुंब कसे जगवावे, या विवंचनेत शेतमजूर दिसून येत आहेत़
जिल्ह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही़ शेतकऱ्यांनी धोका पत्करून पेरणी केली आहे़