४० हेक्टरवर कांद्याची पेरणी
By Admin | Updated: August 13, 2014 01:07 IST2014-08-13T00:44:34+5:302014-08-13T01:07:10+5:30
शिरूर अनंतपाळ : सातत्याने एकाच पद्धतीची पिके घेतल्याने त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने पिकांची फेरपालट करून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच

४० हेक्टरवर कांद्याची पेरणी
शिरूर अनंतपाळ : सातत्याने एकाच पद्धतीची पिके घेतल्याने त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने पिकांची फेरपालट करून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच उत्पादन वृद्धीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी पथदर्शी प्रकल्प तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला यामध्ये एकंदर ४० हेक्टरवर कांद्याची लागवड नव्हे तर यंत्राद्वारे पेरणी केली आहे़ त्यामुळे या पथदर्शी प्रकल्पास अनेक शेतकरी भेट देत आहेत़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टर्स लावगडीयोग्य जमीन असली तरी चालू खरीप हंगामात १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ सोयाबीन उत्पादनात शिरूर अनंतपाळ तालुका विभागात अव्वल आला तेव्हांपासून शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पादनाकडे कल वाढला आहे़ सोयाबीन उत्पादक तालुका म्हणूनच शिरूर अनंतपाळची ओळख वाढली आहे़ शिवाय सोयाबीन नगदी पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते़ जास्तीत जास्त क्षेत्रावर एकाच पिकांची पेरणी होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत असून त्याचा थेट उत्पादन वृद्धीवर परिणाम होत आहे़ यासाठी तालुक्यातील उजेड, आनंदवाडी, वांजरवाडा, फक्रानपूर, डोंगरगाव, हालकी, शिरूर अनंतपाळ आदी गावातील विविध शेतकऱ्यांनी एकंदर ४० हेक्टरवर कांद्याची पेरणी केली आहे़ त्यामुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीचा पोत सुधारणार आहे़
या कांदा पेरणीच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत तालुका कृषी अधिकारी डी़बी़ सुतार व अनंत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करून नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादन घ्यावे, यासाठी प्रत्येक गावात साप्ताहिक चर्चासत्र घेऊन कांदा पेरणीची माहिती देण्यात येणार असल्याचे सुतार व गायकवाड यांनी सांगितले़
४कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी योग्य भाव पडावा, यासाठी कृषी विज्ञान मंडळाच्या संगणकावर आॅनलाईन बाजारपेठबाबतही मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा फायदा करण्यात येणार आहे़