लवकरच दररोज पाणी
By Admin | Updated: February 18, 2016 00:08 IST2016-02-18T00:05:21+5:302016-02-18T00:08:58+5:30
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

लवकरच दररोज पाणी
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून एक थेंबही अतिरिक्त पाणी न घेता दररोज पाणी कसे देता येईल, याचे नियोजन करणे सुरू केले आहे. शहरातील अंतर्गत लिकेजेस बंद करून नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.
मागील काही वर्षांपासून मनपा शहराला दोन दिवसांआड पाणी देत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळते. शहराबाहेर अनेक वसाहतींना मनपा पाणी देण्यास असमर्थता दर्शवीत आहे. नवीन वसाहतींना किमान टँकरने तरी पाणी मिळावे, अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. त्यातच सातारा-देवळाई परिसर मनपाच्या ताब्यात आल्याने या भागातील ४०-४५ हजार नागरिकांना पाणी देण्याचे दायित्व मनपावर येऊन पडले आहे.
जायकवाडी धरणात सध्या ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातील सुमारे ४० टीएमसी पाणी मनपाला पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपयुक्त साठा संपल्यावर मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. २०१२ मध्ये जशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीनचे सहा पंप तयार ठेवण्याचे आदेश केंद्रेकर यांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसह मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरातील ११३ वॉर्डांमध्ये लिकेज खूप आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेजेस बंद करून दररोज पाणी नागरिकांना कसे देता येईल, यावर अधिक भर देण्यात आला आहे. मनपा पाण्याचा अपव्यय टाळून ते नागरिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे. कारण त्यांचा तो हक्कआहे, असेही केंद्रेकर यांनी नमूद केले. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून वाद निर्माण होतात. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा जास्तीत जास्त सुरळीत कसा राहील, यावरही मनपा अधिक भर देणार आहे.