छत्रपती संभाजीनगर : सुसाट कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या चार कार व एक दुचाकी एकमेकांवर आदळून अपघात झाला. मंगळवारी रात्री ८:३० वाजता सेव्हन हिल उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुदैवाने कोणाला विशेष इजा झाली नाही.
उच्च न्यायालयाकडून सेव्हन हिलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आकाशवाणीकडे जाणाऱ्या बाजूने रात्री ८:३० वाजता सुसाट जाणाऱ्या एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबले. परिणामी, मागून जाणाऱ्या चार कार व एक दुचाकीस्वार क्षणात एकमेकांवर आदळले. यात ब्रेक दाबणारा कारचालक मात्र तत्काळ पसार झाला. यामुळे पाचही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. वर्दळीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. सेव्हन हिल चौकात तैनात वाहतूक पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
कोणीही जखमी नाहीअपघातात दुचाकीस्वाराच्या हाताला जखम झाली. अन्य कोणाला इजा झाली नाही. याच दरम्यान पुलाच्या दुसऱ्या बाजूला अपघात पाहण्याच्या नादात एका चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने सदर दुचाकीस्वार तोल जाऊन खाली पडून जखमी झाला.