पुरातन बाराखांबी मंदिराचा काही भाग ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:21 IST2017-10-03T00:21:16+5:302017-10-03T00:21:16+5:30
प्राचीन हेमाडपंथी कलेचा नमुना असणाºया अंबाजोगाई येथील बाराखांबी उर्फ सकलेश्वर मंदिराचा काही भाग पावसामुळे ढासळला आहे.

पुरातन बाराखांबी मंदिराचा काही भाग ढासळला
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : प्राचीन हेमाडपंथी कलेचा नमुना असणाºया अंबाजोगाई येथील बाराखांबी उर्फ सकलेश्वर मंदिराचा काही भाग पावसामुळे ढासळला आहे. मुख्य गाभाºयाच्या भिंतीचीच पडझड झाल्याने या मंदिराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दहाव्या किंवा अकराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असावी असा कयास आहे. मागील अनेक दशकांपासून हे मंदिर भग्नावस्थेत होते. मागील वर्षी स्वच्छता मोहीम राबवीत असताना या मंदिराच्या खाली मोठी वास्तू असल्याचे अंबाजोगाईतील नागरीकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे काही लोकांनी कसलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे जेसीबी मशीन लावून या मंदिराचे खोदकाम केले. एवढ्या मौल्यवान वास्तूचे उत्खनन अतिशय काळजीपूर्वक करण्यात येत असते. परंतु, गावठी पद्धतीने खोदकाम झाले. या खोदकामात मंदिराच्या आजूबाजूने खड्डे खोदले गेले.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात या खड्यातून पाणी साचून राहिल्याने मंदिर खचून एक बाजू ढासळली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्य गाभाºयाचीच भिंत ढासळल्याने या मंदिराच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
दरम्यान, यासाठी पुरातत्व खाते जबाबदार असल्याचा आरोप इतिहासप्रेमी नागरिक करू लागले आहेत.
अनधिकृत बांधकामाची माहिती मिडियातून मिळाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या संचालकांनी यावर्षीच्या २६ जानेवारी रोजी भेट देऊन मंदिराची पाहणी केली होती. या पाहणीनंतर पत्रकारांशी आणि इतिहास प्रेमी नागरिकांशी बोलताना त्यांनी तातडीने या मंदिराचे जतन करण्यासाठी पाऊले उचलूत असे आश्वासन दिले होते, मात्र अनेक महिन्यानंतरही मंदिराचे जतन तर सोडाच परंतु येथील एकही मूर्ती इंचभरही हलविण्यात आली नाही.