सोशल मीडियाच्या विळख्यातून स्वत:ला सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:59 IST2018-03-05T00:58:43+5:302018-03-05T00:59:03+5:30
सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.

सोशल मीडियाच्या विळख्यातून स्वत:ला सोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.
जैन टॅग ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पाटणी यांनी ‘यू लिव्ह ओन्ली वन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष ललित पाटणी, मनीषा भन्साली, सोनाली पाटणी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर बोलताना डॉ. पाटणी म्हणाले, जीवनामध्ये आनंदी, सुखी, संपन्न राहण्यासाठी प्रत्येकाला भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. भाषा वापरताना त्यात जीव असला पाहिजे. त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आनंद मिळत नाही. याचबरोबर प्रत्येक जण आपल्या पाल्यांवर प्रेम करतात. मात्र त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी मागेपुढे पाहिले जाते, असे होऊ नये. कारण उद्या तेच पाल्य आपल्याला वेळ देणार नाहीत. या वेळेच्या बाबतीत सध्या सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीची मालक बनली आहे. मानवाने तंत्रज्ञान निर्माण केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकार्य होणे अपेक्षित होते. मात्र उलटेच घडले. आज तंत्रज्ञानाच्या आहारी मनुष्य गेला आहे. यात माणूस गुलाम आणि तंत्रज्ञान मालक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियात व्हॉटस्अॅपवर साधा मेसेज पडताच आपण त्याला तात्काळ रिप्लाय देतो. आपल्याकडे यासाठी भरपूर वेळ असतो. मात्र कुटुंब, मुलं, कार्यालयीन काम याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. या मोबाईलच्या गुलामीपासून मुक्त व्हा, मोठे होण्यासाठी सोशल मीडिया सोडावाच लागेल, असेही डॉ. पाटणी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे मंगलचरण जयश्री लोहाडे यांनी म्हटले. श्वेता कासलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्वेता गंगवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा अनुपमा दगडा, उपाध्यक्षा दीपिका बडजाते, सचिव श्वेता सेठी, स्वाती कासलीवाल, प्रकल्पप्रमुख श्वेता कासलीवाल, पूजा झांझरी, श्वेता गंगवाल, जयश्री लोहाडे, सदस्या रिचा कासलीवाल, रिना ठोले, मोनिका चांदीवाल यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सभागृह खचाखच भरलेले होते.