१९ गावांत सौरपंप उभारणार
By Admin | Updated: January 12, 2016 23:43 IST2016-01-12T23:38:37+5:302016-01-12T23:43:21+5:30
हिंगोली : जिल्ह्यात नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत १९ गावांत सौरपंप संच उभारणीस मंजुरी मिळाली आहे.

१९ गावांत सौरपंप उभारणार
हिंगोली : जिल्ह्यात नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत १९ गावांत सौरपंप संच उभारणीस मंजुरी मिळाली आहे. या प्रत्येक गावांत पाच लाखांच्या खर्च मर्यादेत पाणीपुरवठ्याची सोय केली जाणार आहे.
वीज खंडित झाली तरी ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ही योजना आणली आहे. यामध्ये मागील काही वर्षांत जवळपास शंभरावर गावांमध्ये कामे झाली आहेत. यावर्षी यामध्ये अवघ्या १९ गावांचे उद्दिष्ट आले आहे. यात वसमत तालुक्यातील वाघी, अकोली त. चिंचोली, लिंगी, तुळजापूरवाडी, कोनाथा, टाकळगाव, कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ, गिरामवाडी, बोल्डावाडी, चुंचा, शेनोडी, सेनगाव तालुक्यातील बेलखेडा, वडहिवरा, सिंनगी खांबा, रेपा, हिंगोली तालुक्यातील करंजळा, वडद, आमला, औंढा नागनाथ तालुक्यातील घारा दुधाळा या गावांचा समावेश आहे.
या योजनेसाठी यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ज्या गावामध्ये बोअरचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध आहे. पाणी पिण्यालायक आहे, अशांचीच निवड करण्यात आली होती. त्यांचे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्या-त्या वर्षी त्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. ही कामे मंजूर झालेल्या गावांत सौरपंप पॅनल, पाण्याची टाकी, दोन स्टँड पोस्ट आदी बाबींची उभारणी करण्यात येणार आहे.
या गावांतील समित्यांना ही कामे कशा पद्धतीने करायची, याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. ही कामे करताना मागच्या काही काळात गावांनी त्रुटी ठेवल्या होत्या. त्या गावांना अडचणीचा सामना करावा लागला. या गावांवर ही वेळ येणार नाही, याची काळजी या कार्यशाळेत घेतली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)