सौरऊर्जा प्रकल्पाला मिळणार गती
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:14+5:302016-04-03T03:50:17+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील कौडगाव औद्योगिक वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या पन्नास मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा काढण्यात आली आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाला मिळणार गती
उस्मानाबाद : तालुक्यातील कौडगाव औद्योगिक वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या पन्नास मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरच गती मिळेल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
कौडगाव येथे अडीच हजार एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा निर्णय झाला असून, त्यापैकी दीड हजार एकर जमीन एमआयडीसीकडे आहे. उर्वरित जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून, उद्योगासाठी उजनी धरणातून २ एमएलडी पाणी आरक्षित आहे. या अनुषंगाने औद्योगिक वसाहतीत तातडीने उद्योग आणण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. यावर बावनकुळे यांनी सदर पन्नास मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली असून, निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल असल्याचे सांगितले. त्यामुळे मे महिन्यापर्यंत निविदा निश्चित होवून कामे सुरू होणे अपेक्षित असल्याची ग्वाही दिल्याने या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.