‘झेडपी’ राबविणार सोलापूर पॅटर्न !
By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:22:04+5:302014-09-07T00:24:04+5:30
उस्मानाबाद : सोलापूर येथील जिल्हा परिषदेने गेट चोरीला गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना सिमेंट काँक्रीटची पडदी बसवून पाणी अडविले आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ३ कोटीचा निधी दिला.

‘झेडपी’ राबविणार सोलापूर पॅटर्न !
उस्मानाबाद : सोलापूर येथील जिल्हा परिषदेने गेट चोरीला गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना सिमेंट काँक्रीटची पडदी बसवून पाणी अडविले आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ३ कोटीचा निधी दिला. याच धर्तीवर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील बंधाऱ्यांनाही काँक्रीट पडदी बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा समिती सभापती डॉ. सुभाष व्हट्टे यांनी याला मंजुरी दिली.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत तब्बल ९५४ कोल्हापुरी बंधारे आहेत. नदी, नाल्यांच्या पात्रातील पाणी अडविण्याच्या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले होते. त्यापैकी आजघडीला ७३३ बंधारेच पाणी अडविण्यायोग्य आहेत. उर्वरित २२१ बंधारे मात्र सध्या तरी निरुपयोगी आहेत. यापैकी ४६ बंधारे बुडीत क्षेत्रामध्ये गेले आहेत.
५२ बंधाऱ्यांना नाममात्र गेटस् शिल्लक आहेत. तर १२३ बंधारे दुरुस्तीला आले आहेत. त्यामुळे कागदावर सिंचन क्षमता वाढली असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र आहे. त्यामुळेच गावालगत बंधारे असूनही ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील काही वर्षातील उन्हाळ्याचे चित्र डोळ्यासमोर आणले असता, जवळपास अडीचशेवर टंचाईग्रस्त गावांना टँकर आणि जलस्त्रोत अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. बंधाऱ्यांना गेटस् नसल्यामुळे पावसाचे पाणी आले तसे वाहून जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही उस्मानाबादप्रमाणेच चित्र होते. येथील जिल्हा परिषदेने पुढाकार घेत, शेष फंडातून कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्रायोगिक तत्वावर काँक्रीट पडदी बसवून घेतल्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाने याची उपयुक्तता लक्षात घेता जवळपास ३ कोटीचा निधी याकरिता दिला. हा सोलापूर पॅटर्न उस्मानाबाद जिल्ह्यातही राबविण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्यातून एका प्रकल्पाला काँक्रीट पडदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सदस्य महेंद्र धुरगुडे, दत्ता साळुंके, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी.एस. देवकर आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
उन्हाळा सुरु झाला की अडीचशेवर गावांना टंचाईचे चटके सोसावे लागतात. अशाच गावामध्ये कोल्हापुरी बंधारे आहेत. मात्र त्यात पाणी आडले जात नाही. त्यामुळे संबंधित गावातील सार्वजनिक जलस्त्रोताच्या नजीक असलेल्या ४९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना काँक्रीट पडदीसह खोलीकरणाचा प्रस्ताव जिल्हाा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्याकडे पाठविला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अथवा अन्य निधीतून ५ कोटी ४५ लाख रुपये उपलब्ध करुन द्यावे, असेही प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव २ सप्टेंबर रोजी सादर केला आहे.
जिल्ह्यामध्ये जवळपास २२१ बंधाऱ्यांमध्ये पाणी आडत नाही. काही बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. काहींचे गेट चोरीला गेले आहेत. तर काहींचे नाममात्र गेट शिल्लक आहेत. त्यामुळे या बंधारे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या बंधाऱ्यांना सिमेंट भिंत बांधण्यासाठी (पडदी) निधी देण्यात यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेणार आहेत.