पीकविम्याच्या पैशांचे संथगतीने वाटप
By Admin | Updated: July 14, 2016 01:34 IST2016-07-13T00:18:34+5:302016-07-14T01:34:54+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६

पीकविम्याच्या पैशांचे संथगतीने वाटप
औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत ९६६ कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. महिना उलटला तरी अजूनही ५१७ कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये पडून आहे.
मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे खरीप आणि रबीची पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विभागातील सर्व साडेआठ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा उतरविला होता, त्या सर्वांनाच विम्याच्या लाभाची रक्कम मंजूर झाली आहे. गतवर्षीची ही रक्कम दीड महिन्यापूर्वीच कंपनीकडून त्या त्या जिल्ह्यांना मिळाली. मात्र या रकमेचे शेतकऱ्यांना संथगतीने वाटप सुरू आहे. आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे.
जालना आणि बीड जिल्ह्यांतही पीकविम्याच्या पूर्ण रकमेचे वाटप झालेले नाही. जालना जिल्ह्यासाठी एकूण ४३१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. त्यापैकी आतापर्यंत २९४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १३७ कोटी रुपये अजूनही बँकांमध्ये पडून आहेत. बीड जिल्ह्यातही अजून ३३८ कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. बीड जिल्ह्यासाठी तब्बल ८९२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ५५४ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकांकडे कामाचा ताण असल्यामुळेच या रकमेचे वाटप संथगतीने सुरू आहे; परंतु हे जुलै अखेरपर्यंत हे वाटप पूर्ण होईल असा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे.