सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदीचा अहवाल मागविला
By Admin | Updated: June 10, 2014 00:17 IST2014-06-09T23:54:22+5:302014-06-10T00:17:56+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने चक्क साडेचार हजार रुपयांमध्ये मिळणारे ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी ७ लाख रुपये खर्च करून पाण्यात टाकण्यासाठी
सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदीचा अहवाल मागविला
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने चक्क साडेचार हजार रुपयांमध्ये मिळणारे ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी ७ लाख रुपये खर्च करून पाण्यात टाकण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईड या रसायनाची खरेदी केल्याच्या प्रकाराचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त व पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला २०१३-१४ या वर्षाकरीता ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याकरीता ७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी जि. प. ने नियमांची पळवाट शोधत महागडे सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदी केले होते. ब्लिचिंग पावडरचा दर जिल्हा परिषदेने निविदा मागवून गतवर्षी १६ रुपये ६० पैसे प्रतिकिलो निश्चित केला होता. तर सोडियम हायड्रोक्लोराईडच्या २०० मि. मी. बॉटलचा दर ३३ रुपये आहे. जिल्हा परिषदेला ब्लिचिंग पावडर खरेदी करणे फायद्याचे ठरत असताना जि. प. तील अधिकाऱ्यांनी शासकीय नियमांमधून पळवाट शोधत सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी केली व अनुदानाचा गैरवापर केला, असे वृत्त ६ मे रोजी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या वृत्ताची राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयानेही दखल घेतली असून, या विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनीही याबाबतचा अहवाल जि. प. कडून मागविला आहे. आता या प्रकरणी जि. प. शासनाकडे काय अहवाल सादर करणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)