सोसायटीचा सचिव चतुर्भुज
By Admin | Updated: September 4, 2015 00:38 IST2015-09-04T00:35:19+5:302015-09-04T00:38:32+5:30
उस्मानाबाद : पाटोदा येथील शेतकऱ्याला विकास सेवा सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ३०० रूपयांची लाच स्विकारणाऱ्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने

सोसायटीचा सचिव चतुर्भुज
उस्मानाबाद : पाटोदा येथील शेतकऱ्याला विकास सेवा सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ३०० रूपयांची लाच स्विकारणाऱ्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात करण्यात आली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तक्रारदार हे मागील तीन वर्षापासून सभासद आहेत़ तक्रारदार यांना चालू वर्षी स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या तुळजापूर शाखेतून पीककर्ज काढायचे होते़ त्यामुळे त्यांनी ३० आॅगस्ट रोजी पाटोदा सोसायटीच्या चेअरमन यांच्याकडे जावून पीककर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची गरज आहे़ ते देण्याची मागणी केली़ चेअरमन यांनी बेबाकी प्रमाणपत्र भरून त्यावर स्वत:ची सही व शिक्का मारून सचिव सचिव राजेंद्र जगन्नाथ पवार (वय-३७) यांची सही घेण्यास सांगितले़ तक्रारदाराने ३१ आॅगस्ट रोजी सचिव पवार यांना बेबाकी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी फोन लावला होता़ त्यावेळी पवार यांनी मी जागजी येथे येण्यास सांगितले़ तक्रारदार यांनी जागजीला येणे शक्य नसल्याचे सांगितले होते़ त्यानंतर पवार यांना २ सप्टेंबर रोजी तक्रारदाराने बेबाकी प्रमाणपत्रासाठी फोन केला त्यावेळी पवार यांनी ‘मी उद्या उस्मानाबाद येथे येणार आहे, तू पण उस्मानाबादला ये, स्टॅन्डवर भेटू’ असे सांगितले़ तक्रारदार यांनी ३ सप्टेंबर रोजी पवार यांची उस्मानाबाद बसस्थानकात भेट घेतली़ तक्रारदार यांच्याकडील बेबाकी प्रमाणपत्र त्यांनी घेतले़ त्यावर गट सचिव असे छापील अक्षर असलेल्या ठिकाणी वरच्या बाजूस सही केली व सदरचे बेबाकी प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून तक्रारदार यांना ‘३०० रूपये दे व प्रमाणपत्र घेवून जा’ असे सांगितले़ त्यानंतर तक्रारदाराने थेट एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दिली़
एसीबीचे उपाधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले, पोनि बाळासाहेब आघाव, सपोफौ दिलीप पवार, धनंजय म्हेत्रे आदीच्या पथकाने जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सापळा रचला़ तक्रारदाराला सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी सचिव राजेंद्र जगन्नाथ पवार यांनी ३०० रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)