सामाजिक न्याय संकटात-तिवारी
By Admin | Updated: June 26, 2017 00:14 IST2017-06-26T00:12:44+5:302017-06-26T00:14:48+5:30
नांदेड: सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़

सामाजिक न्याय संकटात-तिवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गोरक्षणाच्या नावाखाली माणसांच्या खुलेआम हत्या केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय ताब्यात घेतल्या जात आहेत़ आम आदमीच्या सुविधा काढल्या जात आहेत़, असे असतानाही सगळीकडे शांतता आहे़ सामाजिक भेदभाव, आर्थिक विषमता, सांस्कृतिक पतन, धार्मिक दुही यामुळे सामाजिक न्याय संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ बजरंग बिहारी तिवारी यांनी केले़
प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या पाचव्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़
देशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसक कारवायांसंदर्भात चिंता व्यक्त करताना तिवारी म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव देशभर साजरा करण्यात आला़ आज गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम व दलितांची खुलेआम हत्या होत आहेत़ नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला़ आम आदमीच्या रेल्वेतील सुविधा काढण्यात आल्या आहेत़ असे असतानाही लोक शांतच राहिले़ हे मोठे कोडे असल्याचेही तिवारी म्हणाले़
या संमेलनाची भूमिका मांडताना डॉ़ श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, संमेलन संस्कृतीला वेगळे वळण देणारे हे संमेलन असून वैचारिक भूूक भागविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समृद्ध वैचारिक वारसा आहे, त्याचा जागर करण्यासाठी व समकालीन वास्तव बदलण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे़ संयोजक नयन बाराहाते म्हणाले, भारतातील सर्वांवर हिंदू राज्य लादण्याची भाषा आजचा शासक वर्ग करीत आहे़ हिंदू राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात संशय नाही़ हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे़ म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राज्य घडू देता कामा नये, असे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते़ त्याचे स्मरण करणे या संमेलनाच्या निमित्ताने गरजेचे आहे़
सूत्रसंचालन डॉ़ पी़ विठ्ठल यांनी केले़ मान्यवरांचे स्वागत राम शेवडीकर, प्रा़ डॉ़ यशपाल भिंगे, प्रा़ डॉ़ केशव सखाराम देशमुख, रेवती गव्हाणे, डॉ़ रवी सरोदे, सतीश कुलकर्णी, डॉ़ करूणा जमदाडे यांनी केले़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती़