आतापर्यंत ४४% पेरणी

By Admin | Updated: July 3, 2016 00:46 IST2016-07-03T00:30:13+5:302016-07-03T00:46:49+5:30

औरंगाबाद : जून महिना संपला तरी जिल्ह्यात अजून निम्म्या क्षेत्रावरही खरिपाची पेरणी झालेली नाही. १ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

So far 44% sowing | आतापर्यंत ४४% पेरणी

आतापर्यंत ४४% पेरणी

औरंगाबाद : जून महिना संपला तरी जिल्ह्यात अजून निम्म्या क्षेत्रावरही खरिपाची पेरणी झालेली नाही. १ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी पेरणी ही वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत सरासरी १३९ मि. मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ७९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे. २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवातच झालेली नव्हती. मात्र, त्यानंतर आठवडाभरात काही प्रमाणात पाऊस झाला.
त्यानंतर पेरण्यांना सुरुवात झाली. असे असले तरी अजूनही अनेक भागांत पेरणीसारखा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेषत: गंगापूर आणि खुलताबाद या दोन तालुक्यांमध्ये तर पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ४४ टक्के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी पेरणीयोग्य क्षेत्र ७ लाख ३६ हजार हेक्टर इतके आहे.
आतापर्यंत त्यातील ३ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र हे कपाशीचे आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. हे प्रमाण ४६ टक्के इतके आहे.
त्याचप्रमाणे मका पिकाचाही निम्माच पेरा होऊ शकला आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार हेक्टर इतके आहे. आतापर्यंत ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. याशिवाय तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांची अजून अत्यल्प क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. पेरणीमध्ये फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यामध्ये सरासरी ६० ते ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कन्नड तालुक्यात ५० टक्के आणि पैठण तालुक्यात ५५ टक्केक्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Web Title: So far 44% sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.