आतापर्यंत १२२ प्रस्ताव दाखल
By Admin | Updated: July 26, 2014 00:36 IST2014-07-25T23:43:11+5:302014-07-26T00:36:22+5:30
सतीश जोशी, परभणी आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे.

आतापर्यंत १२२ प्रस्ताव दाखल
सतीश जोशी, परभणी
आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या आमदार निधीचा आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निवडणुकीपूर्वी विनियोग करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा निधी खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विविध १२२ कामांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी सर्वाधिक ४४ कामे प्रस्तावित केली आहेत.
प्रत्येक आमदाराला आर्थिक वर्षात आपल्या मतदारसंघात करावयाच्या विकास कामांसाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होतो. १ एप्रिलपासून सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. परंतु, हा निधी विकासकामावर खर्च करण्यासाठी कामे प्रस्तावित करुन मंजूर करुन घ्यावी लागतात आणि पूर्ण केल्यावर बिल अदा होते. हा सर्व प्रपंच आचारसंहितेपूर्वी करावयाचा आहे. यासाठी आमदारांनी विविध कामे प्रशासनाकडे प्रस्तावित केली आहेत.
गंगाखेडचे आ.सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाखांची २७ कामे, पाथरीच्या आ.मीराताई रेंगे यांनी ८० लाखांची २० कामे, बोर्डीकर यांनी १ कोटी ७१ लाखांची ४४ कामे तर विधानपरिषद सदस्य आ.बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८६ लाख रुपयांची ३१ कामे प्रस्तावित केली आहेत. लोकप्रतिनिधींकडून अजूनही कामांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. हे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडे पडून आहेत.