मुख्य रस्त्यावरील शेडवर चोरट्यांचा डल्ला
By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-19T00:03:59+5:302014-06-19T00:19:21+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमधील साहित्यावर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारल्याची घटना १७ जून रोजी घडली

मुख्य रस्त्यावरील शेडवर चोरट्यांचा डल्ला
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमधील खत, सोयाबीन बियाणे, विंधन विहिरीची विद्युत मोटार, स्टार्टर आदी कृषी उपयोगी साहित्यावर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारल्याची घटना १७ जून रोजी घडली. तालुक्यातील कोणत्याही चोरीचा तपास पोलिसांकडून लागला नाही. त्यामुळे चोरट्यांनी आता भरदिवसा चोरी करण्याचे धाडस करून पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा घेत तपासाचे आव्हान निर्माण केले आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील शेतकरी मारोती भानुदास लवांडे यांचे शिवपूर-शिरूर अनंतपाळ या मुख्य रस्त्यावर शेत सर्वे नंबर २२९ मध्ये पत्र्याचे शेड आहे. खरीप हंगामाची पेरणी वेळेवर करावी, या अपेक्षेने शेतकरी मारोती लवांडे यांनी शेतातच २५ पोते खत, सोयाबीन बियाणे, कृषीपंपाची विद्युत मोटार, स्टार्टर ठेवले होते.
पत्र्याच्या शेडला कुलूप लावून काही कामासाठी घराकडे गेले होते. तेव्हा मंगळवारी भरदिवसा दुपारी अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून २२ हजार ५०० रुपयांची विद्युत मोटार, ५ हजार ७०० रुपयांच्या सोयाबीन बॅग, २ हजार ४०० रुपयांचा खत आणि १ हजार ३५० रुपयांचे स्टार्टर पळविले आहे. ऐन खरीप हंगामापूर्वीच चोरीची घटना घडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पोलिस सदरील चोरीच्या घटनेचा तपास लावणार का? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
(वार्ताहर)
ऐन खरीप हंगामापूर्वीच विद्युत मोटार, खत, बियाणे, स्टार्टर चोरीस गेल्याने कृषी पंपाचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून, खत, बियाणे दुबार खरेदी करण्याची वेळ आली असल्याने शेतकरी मारोती लवांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४८/२०१४ कलम ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील बिबराळ आणि बसपूर येथील सोयाबीनची चक्क वाहन वापरून काही दिवसांपूर्वी झाली होती. त्याचा तपास लागला नाही. त्यामुळे चोरटे चांगलेच निर्ढावले असून, आता भरदिवसा डल्ला मारत असल्याने पोलिसांचा वचक नसल्याचेच दिसून येते, अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.