स्वयंपाक घरात निघाला घोणस साप
By Admin | Updated: August 10, 2014 23:51 IST2014-08-10T23:46:09+5:302014-08-10T23:51:45+5:30
स्वयंपाक घरात निघाला घोणस साप

स्वयंपाक घरात निघाला घोणस साप
परभणी : मध्यरात्रीची वेळ.... घरातील सर्व जण गाढ झोपेत.. अचानक खडकन् झालेला आवाज... उठून पाहतोय तर किचन ओट्याखाली भला मोठा साप... अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग बेतला तो विजयश्रीनगरातील पवार कुटुंबियांवर. परंतु मध्यरात्री धावून आलेल्या सर्पमित्राने या सापाला अलगद पकडले आणि कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला...
दोन दिवसांपूर्वीचा हा प्रसंग आहे. शहरातील कारेगावरोड भागातील विजयश्रीनगरात गोकुळसिंह लक्ष्मणसिंह पवार हे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नळाला पाणी आल्याने कुटुंबियांनी घराच्या बाहेर असलेल्या नळावरुन पाणी भरले. बाहेर ठेवलेली पाण्याची टाकी उचलून घरात आणली. परंतु तेवढ्याच वेळात एक साप घरात घुसला. हे कोणाच्याही लक्षात आले नाही. सर्व जण झोपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात स्वयंपाक घराच्या ओट्याखाली भांडे पडल्याचा आवाज झाला. काय आहे म्हणून ओट्याकडे बघितले असता मोठा साप निपचित पडल्याचे सदस्यांना दिसले. मग काय घाबरलेल्या कुटुंबियांची सुरू झाली धावपळ. वेळ मध्यरात्रीची असल्याने मदतीला येण्याची शक्यताही कमीच होती. कोणी तरी सर्पमित्रांचा नंबर दिला. त्यावरुन वन्यजीव संवर्धन संस्थेचे ज्ञानेश डाके यांना दूरध्वनीवरुन ही माहिती दिली. तेवढ्या रात्री ज्ञानेश डाके यांनी विजयश्री नगरात येऊन या सापाला पकडले. घोणस या जातीचा हा साप विषारी असल्याचे त्यांनी सांगितले. साडेतीन फूट लांबिचा हा साप होता. रात्रीतूनच त्याला परभणी शहरापासून दूर अंतरावर सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
कुष्ठरोग शिबीर
परभणी : येथील योगानंद प्राथमिक विद्यालयात कुष्ठरोग निदान शिबीर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहूल ससाने तर प्रमुख पाहुणे म्हणून अवैद्यकीय सहायक बी.एस. भोसले, पी.एम. बचाटे, के.पी. सावंत, राठोड, डी.एस. शिंदे आदींची उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांनी कुष्ठरोगाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कल्याण मेकडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन कुबे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)