गंधोऱ्याच्या शाळेत निघतात साप अन् विंचू
By Admin | Updated: August 8, 2016 00:41 IST2016-08-08T00:38:05+5:302016-08-08T00:41:11+5:30
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा हे गाव आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे

गंधोऱ्याच्या शाळेत निघतात साप अन् विंचू
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा हे गाव आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या अतिधोकादायक इमारतीत बसून विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. एवढेच नाही, तर फरशीखालून साप, विंचू निघण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. असे असतानाही काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेकडून नवीन वर्गखोल्यांसाठी निधी मिळत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गंधोरा गावात जि.प. ची इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत शाळा आहे. सदरील शाळेची इमारत ही १९४२ मध्ये लोकसहभागातून बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ही इमारात सध्या कालबाह्य झालेली आहे. इमारतीच्या भिंतीला जागोजागी तडे गेले आहेत. स्लॅबचे प्लास्टरही निखळून पडत आहे. बीमही झुकला असून पाऊस पडल्यानंतर इमारतीला गळती लागते. येथेच विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. शाळेतील नऊ पैकी ८ वर्गखोल्या अतिधोकादायक आहेत. ही बाब जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींच्या भेटीतही समोर आली. दरम्यान, दोन ते तीन वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ शासनाकडे नवीन वर्गखोल्या बांधण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आठ दिवसांत इमारतीचा प्रश्न मार्गी नाही लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच प्रभाकर भोसले यांनी दिला आहे.
शाळा समाज मंदिर अथवा विठ्ठल मंदिर, ग्रामपंचायत अथवा अंगणवाडीमध्ये भरविण्यात यावी, असा सल्ला शाळेला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतलेले हे गाव आहे. या गावातील शाळेचीच अशी अवस्था झाली असले तर दुसऱ्या शाळेचा विचार न केलेलाच बरा.
४याबाबत केंद्रप्रमुख तानाजी महाजन म्हणाले की, गंधोरा जि.प. शाळेची पूर्ण इमारतच अतिधोकादायक बनल्याने बसण्यासाठी योग्य नाही. परंतु नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यासाठी ग्रा.पं. ने जागा उपलब्ध करुन दिल्यास येथील शाळेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल, असे ते म्हणाले.