दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

By Admin | Updated: April 16, 2016 23:27 IST2016-04-16T23:22:37+5:302016-04-16T23:27:21+5:30

बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत.

Smuggling of 25,000 trees a day | दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

दिवसाला अडीच हजार झाडांची तस्करी

व्यंकटेश वैष्णव / राजेश खराडे
ल्ल बीड
बीड जिल्ह्यात ४६ हजार ८०० हेक्टरावर गायरान क्षेत्र आहे. दहा वर्षांपूर्वी मोठ्या झाडांची संख्या भरपूर होती. आता मात्र, गायरान जमीन उजाड झाल्या आहेत. दहा वर्षात येथील वृक्षांचे काय झाले ? हे दस्तुरखुद्द वनविभाग देखील सांगू शकत नाही, हे वास्तव आहे.
दिवसाला अडीच हजार वृक्षांची तस्करी केली जात आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत आहे. सिंचन, पाणी या विषयावर मोठी चर्चा होते. मात्र, वृक्ष लागवड, संगोपनावर कोणीच पुढे येत नाही. जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख हे मागील २७ वर्षांपासून वृक्ष वाचविण्यासाठी एकाकी झुंज देत आहेत. आता शेतकऱ्यांना वृक्ष संगोपनासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन लोढा यांनी केली.
वर्षभरात केवळ ६८ कारवाया
अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ६८ जणांवर वनविभागीय कार्याकडून कारवाया झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर अथपूर्ण हेतूमुळे वनरक्षक, वनमजूर यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. वनरक्षक, मोबाईल स्कॉड तसेच पोलीस प्रशासनाचे व वनविभागाचे खबरे असूनही केवळ ६८ कारवाया झाल्या आहेत.
लागवड करूनही मिळेना उभारी
२०१३ ते २०१८ या कालावधीत शतकोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सुरवातीच्या दोन वर्षात २३ लाख वृक्षलागवड केली असल्याचा निर्वाळा वनविभागाने दिला आहे. लागवड झाली असली तरी त्याची जोपासना होत नसल्याने योजनेला उभारी मिळेना झाली आहे. चालू वर्षात १४६४ हेक्टरावर १६ लाख २५ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार कामे सुरू असल्याचे वन विभागीय अधिकारी आर.आर.काळे यांनी सांगितले.
वनक्षेत्रालगतच्या गावांकडून धोका
अवैध वृक्षतोडीचा धोका अधिकतर वनक्षेत्रालगतच्या गावकऱ्यांकडून होत आहे. वनक्षेत्रालगत जिल्ह्यात १२० गावांचा समावेश आहे. जनजागृतीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांची उदासिनता व ग्रामस्थांची मानसिकता बदलत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वृक्षतोडीवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वनक्षेत्रालगतच्या ग्रामस्थांना एल.पी.जी. गॅसचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ३७० जणांना याचे वाटप झाले आहे.
गायरानावर अतिक्रमण
जिल्ह्यात गायरानाचे क्षेत्र ६२ हजार हेक्टरावर होते. या प्रशासनाच्या जागेवर वृक्षलागवड करून वनक्षेत्रवाढीसाठी उपयोग होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या गायरानावरही नागरिक अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे हे क्षेत्र ४८ हजार हेक्टरावर आले आहे. महसून प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही.
वृक्षलागवडीचा दिखावा
वनविभागामार्फत वन क्षेत्र वाढविण्याकरिता वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र वृक्षसंवर्धनाबाबत दुर्लक्ष होत असल्याने लागवडीचा खर्च दरवर्षी खेड्डे खोदण्यातच खर्ची होत आहे. केवळ दिखाऊपणा न करिता सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची जाण ठेऊन कामे होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात अशा प्रकारे विना परवाना वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाते. ठिकठिकाणी झाडांचे ओंडके आढळून येत आहेत. परळी तालुक्यात ओल्या झाडांची साल कापून झाड वाळवले जाते. नंतर सरपणासाठी तोडले जाते.
वर्षभराचे उपक्रम आणि जलयुक्त अभियनांतर्गत जलमृदा संधारणाची कामे झाली आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मंत्र कृतीत उतरिवण्यासाठी वृक्षलागवडीचे पावसाळा हंगामापूर्वीचे नियोजन पूर्ण केले आहे. १ जुलै रोजी जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. - आर.आर.काळे, उपविभागीय वनाधिकारी

Web Title: Smuggling of 25,000 trees a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.