‘स्मार्ट फोन’च बनले मैदान
By Admin | Updated: March 19, 2016 01:08 IST2016-03-19T01:00:44+5:302016-03-19T01:08:19+5:30
औरंगाबाद : अपार्टमेंटमध्ये खेळण्यासाठी असणारा जागेचा अभाव, घरापासून दूर असलेली मैदाने यामुळे १० ते १६ या वयोगटातील मुला-मुलींनी मैदानी खेळांकडे पाठ फिरविली आहे.

‘स्मार्ट फोन’च बनले मैदान
औरंगाबाद : अपार्टमेंटमध्ये खेळण्यासाठी असणारा जागेचा अभाव, घरापासून दूर असलेली मैदाने यामुळे १० ते १६ या वयोगटातील मुला-मुलींनी मैदानी खेळांकडे पाठ फिरविली आहे. स्मार्ट फोन हेच या मुलांसाठी मैदान बनले आहे. वरील वयोगटातील ७० टक्के मुले स्मार्ट फोनवर तासन्तास गेम खेळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
जवळपास सर्वच घरांत संगणक, स्मार्ट फोन उपलब्ध झाले असल्याने मुले त्यांच्या आहारी गेली आहेत. शाळेला जाण्यापूर्वी व शाळेतून आल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा ते स्मार्ट फोन हाताळत बसतात. पालकांनीही मुलांसाठी स्मार्ट फोनवर अनेक गेम्स ‘डाऊनलोड’ करून घेतले आहेत. मैदानावर जाऊन खेळण्यापेक्षा स्मार्ट फोनमधील गेम्स खेळण्यास बच्चेकंपनी प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट फोनवरील गेम्समुळे दूरचित्रवाणीवरील कार्टून्सही आता मागे पडू लागल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. कार्टून्स बघताना मुले निदान जागच्या जागी उड्या तरी मारीत होती; परंतु स्मार्ट फोनमुळे ही हालचालदेखील बंद झाली आहे. स्मार्ट फोनमघ्ये एकटक बघून गेम्स खेळण्यात मुले स्वत:ला गुंतवून ठेवत आहेत. स्मार्ट फोनवरील गेम्समुळे अनेक मुलांना नंबरचे चष्मेदेखील लागत आहेत.
आरोग्यास घातक
स्मार्टफोन व संगणकांवर सातत्याने गेम खेळणे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. अशा मुलांची एकाग्रता कमी होण्याचा तसेच त्यांच्यात विसरभोळेपणा वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्या मुलांमध्ये नेत्रविकार बळावण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.